छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या Chhatrapati Sambhajinagar कन्नड तालुक्यातील डोंगरगावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. गावामध्ये सहा जण टॉर्च घेऊन फिरत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं. काही काळ लोक नेमकं काय करतायेत हे गावकऱ्यांनी पाहिलं आणि मग विचारपूस केली असता शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि अर्थातच या संशयतांचं पितळ उघड पडलं.
गावकऱ्यांच्या कचाट्यात सापडलेल्या या संशयतांनी पळ काढला पण गावकऱ्यांनी यांचा पाठलाग करून सहाच्या सहा जणांना डांबून ठेवलं. विचित्र म्हणजे हे लोक पूजेसाठी लागणार साहित्य पण घेऊन आले होते. जेव्हा लोकांकडे गावकऱ्यांनी चढ्या आवाजात विचारणा केली तेव्हा गुप्तधन शोधण्यासाठी हे लोक फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन शेख बशीर शेख शेरू आणि अब्दुल रहीम शेख या दोघांसह इतर चौघा जणांना ताब्यात घेतल असून यांच्याकडून एक दुचाकी आणि गुप्तधन शोधण्यासाठी आणलेलं पूजेचं साहित्य ताब्यात घेतल आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.