मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. विरोधकांनी काल शेतकरी मदतीवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर काल एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. त्यांनी जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या मार्च आणि एप्रिल २०२३ मधील खर्चाची आकडेवारी मांडली होती. दरम्यान, आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यान्ह भोजन योजनेत जळगाव जिल्ह्यात मोठा घोटाळा झाल्याचं म्हटलंय.
दोन मंत्री कोण?
पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घोटाळ्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, गिरीश महाजनांना सांगते, मी हवेत बोलत नाही. तुम्ही जिल्हा सांगा, मी त्या जिल्ह्यातील सगळे एपिसोड सांगेन, तुमची इच्छा मी पूर्ण करेन , असं अंधारे म्हणाल्या. शिंदे गटातील लोकांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी भाजपाचीच लोक कसं काम करतात हे स्टिंगमधून पुढे आणू शकते. अंधारे पुढे म्हणाल्या की, १०० कोटींचा घोटाळा, हा प्रकार गोरगरिबांच्या तोंडातून घास काढण्याचा आहे. मध्यान्ह भोजनाचे कंत्राट मिळालेल्या ३ कंपन्यांची चौकशी करावी, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
जळगाव जिल्ह्यात या योजनेचे इतके लाभार्थी कसे काय? (Sushma Andhare Statement)
मध्यान्ह योजनेचा लाभ फक्त जळगावात ३५ ते ४० हजार कामगार घेत आहेत. खरंतर कुठल्याच जिल्ह्यात इतके बांधकाम कामगार नसतात. तरीदेखील त्यांनी इतका मोठा आकडा सांगितला. साधारतः अडीच ते तीन हजार बांधकाम कामगार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये असावेत. परंतु जळगाव आकडा मोठा आहे. मध्यान्ह भोजन योजनेवर फेब्रुवारी महिन्यात ७ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर या योजनेवर २५.२७ कोटी रुपये खर्च मार्च आणि एप्रिल महिन्यात झाला आहे. या योजनेत मोठा घोटाळा झाला असून, याची चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं पहिलं अधिवेशन
हे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात अन्याय केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.