पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने मिळत असतात. अशा घटनेमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतं. अशातच शरद पवारांना पुन्हा एकदा मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने फेसबुकवरून ‘तुमचा दाभोळकर करू’ अशी धमकी दिली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा झाली होती. तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. फेसबुक पेजवरून ही धमकी दिली गेली. सागर बर्वे असे अटक या युवकाचे नाव आहे.या तरूणाला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केलीये.न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावलीये.
कोण आहे हा सागर बर्वे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार,सागर बर्वे या तरूणाचे कोणतेही राजकीय कनेक्शन नाही. त्याच्या या कृत्यामागे वेगळेच कारण असल्याची माहिती मिळाली आहे. सागर बर्वे हा अविवाहीत असून त्याचे लग्न होत नाहीये. त्याने तणावामुळे हे कृत्य केल्याचं सांगितलं जातयं. लग्न होत नसल्याच्या तणावातच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटोवरून पेटलेल्या वादामुळे त्याला राग आला आणि त्यातूनच त्याने फेसबुकवर ही पोस्ट केली. ही पोस्ट करण्यामागे माझा कोणताही हेतू नसल्यांच त्याने पोलिसांनी सांगितलयं. यासंबंधित अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गरज पडल्यास शरद पवारांची सुरक्षा वाढवणार
शरद पवार हे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून चौकशीचे आदेश दिले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. गरज पडल्यास शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.