संगमनेर : राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. महाविद्यालयांमध्ये कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. संगमनेर मधील शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
बुधवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. युवा हाच दुवा या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विखे पाटील म्हणाले की, राज्यातील महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याच्या संदर्भाने आठ दिवसातच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालये दिव्यांग बांधव आणि एकल महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.