मुंबई : 2022-2023 हे वर्ष राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप निर्माण करणारच वर्ष म्हणाव लागेल, कारण की शिवसेना ही शिवसैनिकांकडूनच फोडण्यात आली होती आणि दोन गट तयार झाले. त्यानंतर पक्षावरच या फुटलेल्या गटाने दावा सांगत संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला. तसेच आता राष्ट्रवादीत फुट पाडून दोन गट झाल्याचं पाहायला मिळतयं. आता महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येतील का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या दोन्ही धडाडीच्या नेत्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करणार का, असा सवाल केलांय. तसेच पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा थेट मांडला.
वादांमुळेचे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या वाईट राजकीय परिस्थितीतून जातायेत. उद्धव ठाकरेंना आपल्या गटासाठी पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागणारे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरूये. या वादांमुळेचे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते. परंतु, आता या दोघांनी त्यांच्यातील दुरावा दुर करावा आणि एकत्र यावे, अशा चर्चांना चांगलच उधाण आलं आहे. या तीन दिवसातली परिस्थिती पाहता लक्षात येतं की, राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे आगामी काळात राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार राज ठाकरेंना विचारला जातोयं. जर हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत तर पुन्हा नवीन स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळेल.
कुठेतरी ठाम राहणं गरजेचं – राज ठाकरे
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मीडियाला सांगितले की, आमच्या बैठकीत अशी कुठलीही मागणी कोणत्याही नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने केली नाहीये. तुम्ही पत्रकार असं बोलायला लागलात तर या लोकांना हे सर्व हवंच आहे. मला असं वाटतं की, तुम्ही कुठेतरी ठाम राहणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आणि मुळ प्रश्नचं त्यांनी टाळला. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याची कधीच कुणी कल्पना केली नसेल असं घडतंय. खरंतर या घडामोडींना 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच सुरुवात झाली होती. त्याचवेळी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली.
उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही (Raj Thackeray on Uddhav Thackeray and Shivsena)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारतं शिवसेना पक्षात मोठी फूट पाडली. निवडणूक आयोगाकडून शिंदे यांनाच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्काच बसला. त्यामुळे या कठीण काळात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मदत करावी, अशी चर्चा सगळीकडेच सुरूये. परंतु असं काहीही होताना दिसत नसून याउलट नेहमीच ते एकमेकांविरोधात टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरे यांना राजकारणात एकत्र येण्यास विचारले होते, पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही, असं राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.