पुणे : ससून Sasoon रुग्णालयात याआधी देखील अनेक चित्र विचित्र घटना घडल्या आहेत. मोठे आरोपी पळून जाणे, आत्महत्या करणे, थेट रुग्णालयात घुसून मारहाण करणे आणि अशा बऱ्याच घटनांनी ससून आजपर्यंत गाजल आहे. आता पुन्हा एकदा थेट आयसीयूमध्ये जाऊन रुग्णाला उंदीर चावल्याचा प्रकार देखील घडला आहे.
नेमकं काय घडलं ?
सागर रणूसे या तरुणाचा 15 मार्चला अपघात झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. 25 मार्चला त्याच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान त्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला अनेक ठिकाणी उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ससून रुग्णालयावर केला आहे. तर या शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती ढासळत गेली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही अशी ससून रुग्णालयाने आपली बाजू मांडली आहे.
यावर पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी थेट ससून रुग्णालयात जाऊन आज डीनला उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट म्हणून दिला आहे. यावर सोशल मीडियावर त्यांनी स्वतः एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” काल वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिला दिवस होता आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून बातमी आली की अपघाताने जखमी झालेल्या तरुणाला ससून हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात ऍडमिट असताना उंदराने चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.” तसेच या पोस्टमध्ये त्यांनी डिन यांना उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट देतानाचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.