Mumbai Rain : मुंबईत पावसाचा जोरदार कहर सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी इशारा दिला की, येत्या काही तासांपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगडच्या रसायनी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात १९ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलांय. IMD ने 19 जुलैला पालघर रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
बुधवार आणि गुरुवारी ‘ऑरेंज’ अलर्ट (Orange Alert in Mumbai)
गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली असून, शहरात सरासरी 88.24 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पालघरसाठी मंगळवारसाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला होता आणि मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) बुधवार आणि गुरुवारी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस लोकांनी घरातच राहा, सावधगिरी बाळगा. तसेच नद्या आणि इतर पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 46.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान हिल स्टेशनमध्ये सोमवारी सकाळी 8.30 वाजता 9 सेमी इतका मुसळधार पाऊस झाला.
काय आहे ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ऑरेंज अलर्टचा अर्थ असा आहे की, 115.6 मिमी ते 204.4 मिमी पाऊस पडू शकतो. दुसऱ्या शब्दांत, ऑरेंज अलर्ट दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडू शकतो. याचा सरळ अर्थ असा आहे की, हवामान खराब झालं आहे. मुंबईत पुढील आठवड्यात कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ असेल आणि सूर्यप्रकाश कमी असेल.
पावसामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर परिणाम
मंगळवारी मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर परिणाम झाला. शहरातील लोकल गाड्या 20-25 मिनिटे उशिराने धावत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचीही माहिती आहे.