स्वप्ननगरी, मायानगरी असणाऱ्या मुंबईने अनेकांना आसरा देऊन उंच भरारी घेतली आहे. जागतिक दर्जाचं शहर अशी ओळख असलेल्या या मुंबईने ही ओळख कमावताना अनेक घाव देखील सोसले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे १३ जुलै २०११ मधील साखळी बॉम्बस्फोट. या हल्ल्याला आज तब्बल १२ वर्षे उलटून गेली तरी त्याची जखम मुंबईकरांच्या मनावर कायम आहे.
१३ जुलै २०११ ला बॉम्बस्फोट कुठे झाले?
१३ जुलै २०११ ला सायंकाळी ६.५४ वाजेपासू ७.०६ वाजेदरम्यान केवळ १२ मिनिटांच्या वेळेत मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३ बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला तसेच यात १३० जण जखमी झाले. ओपेरा हाउस, झवेरी बाजार आणि दादर पश्चिम या परिसरात हे बॉम्बस्फोट झाले होते.
यापैकी पहिला बॉम्ब दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारातील खाऊगल्लीत एका बाईकला लावण्यात आला होता. हा बॉम्ब ६ वाजून ५४ मिनिटांनी ब्लास्ट झाला आणि परिसर हादरला. दुसरा बॉम्ब चरणी रोड येथील ओपेरा हाऊस परिसरातील प्रसाद चेंबर्स आणि पंचरत्न बिल्डींगच्या बाहेर एका टिफिनमध्ये लावण्यात आलेला होता. या परिसरात हिऱ्यांचा व्यापार करणारे अनेक लोक असतात. सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी हा बॉम्बस्फोट झाला.
दादर परिसरातील कबुतर खाना जवळ असलेल्या डॉ. एंटोनियो डा सिल्वा हायस्कूल बेस्ट बस स्टँडवर एका विजेच्या खांबावर तिसरा बॉम्ब लावण्यात आलेला होता. सायंकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी या परिसरात बॉम्बस्फोट झाला.
बॉम्बस्फोटानंतरची मुंबई
या बॉम्बस्फोटानंतर फोन लाईन जॅम झाली होती. जवळपास २ तास संपर्क तुटला होता. या बॉम्बहल्यातील जखमींना जे.जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, हरकिसोनदास हॉस्पिटल आणि जीटी हॉस्पिटल अशा मुंबईतील विविध रुग्णालयात नेण्यात आले होते. गृह मंत्रालयाने या बॉम्बहल्ल्यास दहशतवादी कृत्य सांगून राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक हल्ल्याच्या ठिकाणी पाठवले होते. या स्फोटांमध्ये ‘आयईडी’ स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे तपासात सांगण्यात आले होते. या हल्ल्यानंतर दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूसह भारतातील इतर महत्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.
१३ जुलैचे बॉम्बस्फोट कशामुळे?
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी दोषी ठरवून पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. कसाबचा वाढदिवस १३ जुलैला होता आणि त्यामुळेच १३ जुलै २०११ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले गेले अशी देखील तेव्हा चर्चा होती. इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड यासीन भटकळ याला देखील नंतर तपासयंत्रणांकडून अटक करण्यात आले होते.
बॉम्बस्फोटाचा तपास
हल्ल्यानंतर मुंबईतील ग्रांट रोड सांताक्रूज परिसरातून पोलिसांनी २ ऍक्टिव्ह बॉम्ब देखील जप्त केले होते. हा हल्ला नेमका कसा झाला, कोणी केला याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून हल्ल्याच्या दिवशी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान देशभरातून पाकिस्तानात केलेल्या फोन कॉलची तपासणी करण्यात आली होती. १८ जुलै २०११ ला या हल्ल्याचा तपास महाराष्ट्र ATS (Anti Terrorist Squad) ला सोपवण्यात आला.
ATS ने आपल्या तपासात एकूण १२ हजार ३७३ लोकांची चौकशी केली. जवळपास २९ दिवस एटीएसकडून चौकशी सुरु होती. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी जवळपास १८० तासांचे सीसीटीवी फुटेज देखील तपासून पहिले गेले. सीसीटीवी फुटेजमध्ये एक व्यक्ती बॉम्ब हल्ल्याच्या जागी बाईक लावून पळताना दिसत होता. झवेरी बाजार ब्लास्टमध्ये ज्या बाईकवर बॉम्ब लावण्यात आला होता ती बाईक चोरी झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला देखील ९ ऑगस्टला अटक करण्यात आली होती.
२३ जानेवारी २०१२ ला मुंबई पोलिसांनी २ संशयित व्यक्ती नामे नकी अहमद वसी अहमद शेख (२२) आणि नदीम अख्तर अशफाक शेख (२३) यांना अटक करून मुंबई बॉम्ब हल्ल्याची केस सोडवल्याचं जाहीर केलं. भायखळामध्ये राहणाऱ्या दोघांनी १८ सिम कार्ड आणि ६ मोबाईल फोन हल्ल्यासाठी वापरल्याची माहिती देखील समोर आली. वक्कास आणि तबरेज अशी या दोन पाकिस्तानी हल्लेखोरांची नावं होती. या दोघांना सह-आरोपी नकी अहमद सिम कार्ड देत होता. आरोपी नकी अहमदने मुंबई बॉम्बस्फोटात स्वतःची भूमिका स्विकारून हल्लेखोरांसाठी त्याने इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासीन भटकळच्या सोबत काम केल्याचीही कबुली दिली होती. त्यानंतर काही काळाने यासीन भटकळला देखील अटक करण्यात आली.
‘आयईडी’ स्फोटक काय असते?
आयईडी म्हणजे Improvised Explosive Device हा देखील एक प्रकारचा बॉम्ब आहे. मात्र या बॉम्बचा वापर सैन्यात केला जात नाही. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये आयईडीचा वापर झाल्याचे अनेक वेळी समोर आले आहे. स्फोटाची तिव्रता वाढवण्यासाठी यामध्ये काही रसायनाचा देखील वापर करण्यात येतो.
मुंबईमध्ये कितीवेळा दहशतवादी हल्ले?
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आतापर्यंत अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. १९९३, २००२, २००३ मध्ये दहशतवादी हल्ले झाले होते. ११ जुलै २००६ ला मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनमध्ये ७ मिनिटाच्या अंतराने ७ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. हे हल्ले मुंबईच्या खार रेल्वे स्टेशन ते बांद्रा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान झाले होते. या हल्यात एकूण १८९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ९०० जण जखमी झाले होते.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. यात १६६ जण मृत्यूमुखी पडले, तर ३०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.