महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडत असताना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतोय, तर काहींना यातून विनोद सुचत आहेत. अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत, थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मिडीयावर मेसेजेच आणि मीम्सचा महापूर आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील सामान्य जनतेसोबतच राजकीय विषयांवर जरा जपुनच व्यक्त होणारे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही यावेळी प्रतिक्रिया देताना दिसले. सोशल मिडीयाद्वारे या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
सुबोध भावे
अभिनेता सुबोध भावे यांने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलेली दिसली. अजित पवारांच्या अनपेक्षित शपथविधीवरील ही प्रतिक्रिया वाटते. “जरा एक दिवस मी मुंबईच्या बाहेर काय गेलो….क्रमश:….” असं या स्टोरीमध्ये लिहिलं आहे.
तेजस्विनी पंडित
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अजित पवारांच्या बंडावर २ ट्विट केलेले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये तिने #Maharashtrapolitics हा हॅशटॅग देऊन “भेळ हवी भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!” असं ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.
“तत्वनिष्ठ, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर “राज” करावं !!! – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक” असं तेजस्विनीने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
शरद पोंक्षे
प्रसिद्द मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर व्यक्त होताना लिहीलं की, “तत्व, वैचारिक बैठक, नितीमत्ता हे शब्द आज वारले.”
हेमंत ढोमे
राज्यातील नाट्यमय राजकारणावर प्रतिक्रिया देत मराठी अभिनेते हेमंत ढोमेने “खेळ तर आता सुरु झालाय…” असं ट्विट केलं आहे.
सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मिडीयावर स्टोरी शेअर करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली की, “पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?”
अभिज्ञा भावे
अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तीच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील एक प्रसंग मिम म्हणून शेअर केला आणि लिहिलं कि, “सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण” या प्रसंगात अभिज्ञा भावे आणि शिल्पा तुळसकर एकमेकांना आलिंगन देताना दिसत आहेत.
स्वप्निल जोशी
या सोबतच मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याने देखील चालू राजकीय नाट्यावर सोशल मिडीयावर प्रतिक्रिया दिली. “उत्तम पटकथा लिहिण्याची कला” असं ट्विट स्वप्निलने केलं आहे. स्वप्निलची ही प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.