Maharashtra Politics : पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप विरोधी पक्षनेता जाहीर न झाल्यानंतर यंदांचं पावसाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडतंय की काय, अशी शंका उपस्थित होत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसकडे चार वर्षांनंतर हे पद आले आहे
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर या पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात आले आहे. काँग्रेसकडे चार वर्षांनंतर हे पद आले आहे.
विरोधी पक्षनेतेपद 2 जुलैपासून रिक्त (Maharashtra Politics)
काँग्रेसचे अनेक नेते या पदासाठी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. यात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, अखेर पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली असून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपद 2 जुलैपासून रिक्त आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकताच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. आपल्यासोबत ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
काँग्रेसचे सर्वाधिक आमदार
नियमानुसार, ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार विरोधी पक्षात असतील त्यांनाच विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो. या नियमाच्या आधारे महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचा स्वतःचा विरोधी पक्ष नेता असणार आहे. ५३ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस जून 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला. संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाले. मात्र, अजित पवार यांच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयानंतर हे पद रिक्त झाले असून काँग्रेस आता ४५ आमदारांसह विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर कॉंग्रेसने विरोधी पक्षनेत्याच्या नावावर निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.