मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर ही लढाई तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला खासदार, आमदार आणि समर्थकांनी हजेरी लावली. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, पक्षासाठी जे चांगलं आहे ते आम्ही केलंय. राष्ट्रवादीला सत्तेत आणून आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा दिलीये. शरद पवार यांनी नरिमन पॉइंट येथे 1 वाजता वाय.बी. चव्हाण केंद्रात जिल्हा ते तालुका पातळीवरील सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावलीये. बैठकीपूर्वी सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख आणि इतर नेते वाय.बी.चव्हाण केंद्रात हजर झालेत.
पक्षाचे आमदार तीन गटात विभागले गेले
आता शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट स्वतःला खरा राष्ट्रवादी म्हणवून घेतायेत. राष्ट्रवादी कोणाची ? यावर निर्णय होण्यापूर्वी आज दोन्ही गटांनी स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. आज सुरू असलेल्या बैठकीत अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि किती आमदार शरद पवारांच्या पाठीशी आहेत, हे स्पष्ट होईल. अजित पवार गटाला ४० आमदारांच्या पाठिंब्याची चर्चा होत असली तरी पक्षाचे आमदार तीन गटात विभागले गेले आहेत. एक गट अजित पवार, तर दुसरा गट शरद पवार यांच्यासोबत आहे. आमदारांचा एक वर्ग असा आहे की, जो अजूनही जर-तरच्या परिस्थितीत अडकला असून, कुठे जायचे हे ठरवता येत नाही. अजित पवारांसोबत जायचे की शरद पवारांसोबत राहायचे? अजित पवार यांना सध्या २४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शरद पवारांच्या समर्थनार्थ १४ आमदार आहेत.
अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणारे आमदार
धनंजय मुंडे (परळी), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), छगन भुजबळ (येवला), आदिती तटकरे (श्रीवर्धन), हसन मुश्रीफ (कागल), अनिल पाटील (अमळनेर), धर्मरावबाबा आत्राम. (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर).
अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार
सुनील टिंगरे (वडगाव शेरी), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), सुनील शेळके (मावळ), अशोक पवार (शिरूर), सरोज अहिरे (देवळाली), अतुल बेनके (जुन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), इंद्रनील नाईक (पुसद) , किरण लहामटे (अकोले), शेखर निकम (चिपळूण), संग्राम जगताप (अहमदनगर), अण्णा बनसोडे (पिंपरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दत्ता भरणे (इंदापूर), नीलेश लंके (पारनेर), दीपक चव्हाण (फलटण).
शरद पवारांच्या सभेला 6 आमदार पोहोचले
शरद पवार यांनी दुपारी 1 वाजता आमदार, खासदार आणि समर्थकांची बैठक बोलावलीये. या बैठकीत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 6 आमदार पोहोचले आहेत.
१. राजेंद्र शिंगणे
२. अनिल देशमुख
३. रोहित पवार
४. देवेंद्र भुयार
५. किरण लहामटे
६. अशोक पवार
भुजबळ म्हणाले- शरद पवारांना आम्ही गुरुदक्षिणा दिली
अजित पवार गटाचे सदस्य छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही आमचं काम केलंय. हा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही. पक्षासाठी जे चांगलं आहे ते आम्ही केलंय. राष्ट्रवादीला सत्तेत आणून आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा दिलीये. त्यांचा पुतण्या उपमुख्यमंत्री झालांय. हे सर्व आम्ही योजनेअंतर्गत केलंय. शरद पवार ६० वर्षे राजकारणात आहेत, तर आम्हीही ५६ वर्षे राजकारण करत आहोत. ही लढाई आम्ही निवडणूक आयोगात लढणार आहोत.









