महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सध्या राजकारणात (Maharashtra Politics) काय घडेल याचा काही नेम नाही. अशात आता पुन्हा राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवी समीकरणं पाहायला मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व चर्चांपैकी काही प्रमुख चर्चा आपण जाणून घेणार आहोत.
अजितदादा होणार मुख्यमंत्री?
पहिली चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री न राहता लवकरच ते मुख्यमंत्री होतील. सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री असून अजित पवारांकडेही हे पद आहे. अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांचा व त्यांच्या समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आहे.
शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील?
अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप आणि अजित पवार यांच्यात झालेल्या वाटाघाटीनुसार अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. मात्र, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. पण आगामी काळात शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील आणि अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर होईल, असंही बोललं जातंय.
फडणवीसांना मिळणार मोठी संधी?
तर याउलट भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागेल म्हणजेच केंद्रात त्यांना मोठं पद मिळेल अशाही चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत. खरंतर, याआधीच म्हणजे शिंदेंच्या बंडावेळीच फडणवीस हे केंद्रात जाण्यासाठी इच्छुक होते, असं सांगितलं जातं. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. परंतु, आता पुन्हा बदलेल्या समीकरणामुळे फडवीसांना केंद्रात स्थान मिळण्यास हरकत नाही, अशा चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
शिंदे गटाची घरवापसी?
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार पुन्हा ठाकरेंकडे परततील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अर्थात 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा याला कारण आहे. शिवाय अजित पवार व राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळेही शिंदे गट नाराज असल्याच्या बातम्या ऐकू येत आहेत. राष्ट्रवादीसह युती नको म्हणणारे आमदार आता त्यांच्याचसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. या मुद्द्यांवरून होणारी टीका आणि आगामी निवडणुकांचा विचार करता शिंदे गटातील काही आमदार पुन्हा ठाकरेंकडे येतील, असं सांगितलं जातंय.
ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार?
यानंतर आणखी महत्वाची चर्चा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याची. सध्या राजकारणातील परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील एकत्र येतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. स्वप्नातही कधी विचार केला नसेल अशा गोष्टी सत्यात घडताना दिसत आहेत. त्यातच मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह प्रवास केल्याने ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय चर्चेत आला. इतकंच नाही तर पानसेंनी राऊतांकडे युतीचा प्रस्ताव दिला असल्याचंही बोललं जातंय.
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचा नंबर?
याशिवाय काँग्रेसचे आमदार फुटतील अशी चर्चाही डोकं वर काढू लागली आहे. यापूर्वी देखील काँग्रेसचे आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील आणि भाजपात प्रवेश करतील, असा दावा भाजप नेते करत होते. यात काँग्रेसमधल्या अनेक बड्या नेत्यांची नावं आहेत, असंही सांगण्यात आलं होतं. तर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर काँग्रेसचा नंबर असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.
पंकजा मुंडे घेणार मोठा निर्णय?
या सर्व चर्चांमध्ये महिला नेत्यांपैकी कायम चर्चेत असणारं एक नाव म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जातंय. त्यांनी हे वृत्त फेटाळलं जरी असलं तरी गेल्या अनेक दिवसांपासून त्या पक्षात नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यांना वारंवार पक्षात डावलण्यात येत असल्याने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जाहीररीत्या आपली नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात. नाराजीच्या बातम्यांमुळे आतापर्यंत पंकजा यांना अनेक पक्षाकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. अशातच त्यांचे बंधू आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे पंकजा सुद्धा आपला मार्ग बदलतील, अशा चर्चांना उधाण आलंय.