मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलांय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये. शरद पवार यांना जोरदार झटका बसला असून त्यांचे पुतणे अजित पवार 9 आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यांना राष्ट्रवादीच्या किमान 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. यानंतर घाईगडबडीत एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपासोबत का नाही अशी भूमिका अजित पवारांनी मांडलीये. यानंतर अनेक नेत्यांनी एकामागून एक प्रतिक्रिया दिल्यात.
राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा?
अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीये. यामध्ये छगन भुजबळ, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी देखील अजित पवारांना आपला पाठिंबा दिला आहे. राजभवनातील शपथविधी सोहळ्याला देखील प्रफुल पटेल हजर होते.
आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देत 35 आमदारांनी सह्या केल्याची महिती समोर येत आहे. मात्र हा आकडा आणखी जास्त असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचा देखील अजित पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे कोणते नेते शरद पवारांसोबत? (Which leaders support Sharad Pawar in Maharashtra Political Crisis)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “मी शरद पवार साहेबांसोबतच” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी आपण सभापतींना पत्र लिहिल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपण कायम शरद पवार साहेबांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीतर्फे त्यांची प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण जो व्हिप काढणार तो सर्व आमदारांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार म्हणाले की, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहता सगळ्यांनाच वाटतंय की, आजचं राजकारण गलिच्छ झालंय. आम्ही राजकारणात येऊन चूक केली की काय असं माझ्यासारख्या नवीन आमदारांना वाटायला लागलंय. अजित पवारांबद्दल मी भावनिक आहे. ते माझे काका आहे. अनेकदा त्यांनी मला मदत केलीये. परंतु मी कायम शरद पवारांसोबत कायम असणार आहे.
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रोफेशनल लाईफ आणि खाजगी नाती यात गल्लत करू नये एवढी मॅच्युरिटी मला आलेली आहे. माझ्यासाठी दादा कायम दादाच राहील. सत्ता असतानाही अजित पवारांची आणि इतर पक्षातल्या आमदारांची भाजपला गरज का वाटली असावी याचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, सत्ता असतानाही त्यांना कदाचित आत्मविश्वास नसावा की आपण निवडणुका जिंकू शकू. या पक्षाचा विश्वसनीय चेहरा शरद पवार आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत मी कायम असणारे. दुसरा कोणता पर्यायच मला उपलब्ध नाही.
यासोबतच माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, सुमनताई पाटील, राजेंद्र सिंगानी, नरेंद्र वर्मा, खासदार श्रीनिवास पाटील, सुनिल भुसारा, अमोल कोल्हेंसोबत इतरही अनेक नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.