अभिनेत्री माधूरी दीक्षीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळ आणि प्रसारमाध्यमांतून सुरु आहे. या वृत्त आणि चर्चेला पक्ष अथवा अभिनेत्रीकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक 2024 जिंकण्याचे मोठे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप समोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी आणि सातत्याने चर्चेत असलेल्या चेहऱ्यांवर भाजपचा डोळा आहे. या चेहऱ्यांना भाजपमध्ये घेऊन थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवायचा विचार पक्षनेतृत्वाच्या मनात असल्याची चर्चा खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्येही आहे. उघडपणे मात्र यावर कोणीही बोलताना दिसत नाही.
येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपातर्फे (BJP) माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही माधुरी दिक्षीत लोकसभेची जागा लढवणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र त्याचे पुढे काहीच झालं नाही. मात्र यंदा माधुरी निवडणूक लढणार असल्याचे म्हटलं जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवादरम्यान 23 सप्टेंबरला मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे म्हटलं जात होतं. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित-नेने भाजपाच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे कळत आहे. मात्र माधुरी दीक्षितला मध्य मुंबईतून भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीतही पुण्यातून भाजपाकडून अभिनेत्री माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता होता. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षणही केले होते. या सर्वेक्षणानुसार अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियाना अंतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट देखील घेतली होती.