राष्ट्र्वादीचे नेते अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (Ajit Pawar took oath as Deputy CM) आता महाराष्ट्रात एकाच वेळी २ उपमुख्यमंत्री आहेत. एकाच वेळी एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असण्याची महाराष्ट्रात हि पहिलीच वेळ आहे. गेल्या आठवड्यात छत्तीसगड मध्ये टी. एस. सिंगदेव यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर उपमुख्यमंत्रीपदा बाबतच्या चर्चाना उधाण आलं.
एखाद्या राज्यात एका वेळी किती उपमुख्यमंत्री असू शकतात? उपमुख्यमंत्री पदाबाबत कायदा काय आहे? भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण? आता पर्यंत कोणत्या राज्यात सर्वात जास्त उपमुख्यमंत्री एकाच वेळी राहिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पुढे सविस्तर जाणुन घेऊयात.
उपमुख्यमंत्री पद संवैधानिक? (Is Deputy CM a constitutional post)
भारताच्या संविधानात कुठेच ‘उपमुख्यमंत्री’ या पदाचा उल्लेखच नाही. म्हणून हे असंवैधानिक पद असून याची निर्मिती राजकारण्यांनी स्वतःच्या सोयीसाठी केल्याचे दिसते. सत्तेत सहभागी झालेल्या एखाद्या मोठ्या नेत्याला योग्य सन्मान देण्याकरिता या पदाचा वापर केलेला दिसतो. मंत्रीमंडळातील इतर मंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला एकसमानच अधिकार आणि पगार किंवा भत्ता असतो. अनेकदा एखाद्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांची जागा उपमुख्यमंत्री घेतात असं दिसतं. मात्र उपमुख्यमंत्री नसले तरीही मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांची जागा मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्याला सोपविली जाते.
उपमुख्यमंत्री कोणकोणत्या राज्यात?
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅण्ड, मिझोराम या राज्यांमध्ये सध्याच्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री या पदी वरिष्ठ नेत्याची नियुक्ती झालेली दिसते. तर उर्वरित राज्यांमध्ये सध्या उपमुख्यमंत्री या पदावर कोणतीही व्यक्ती नाही.
सर्वात जास्त उपमुख्यमंत्री कोणत्या राज्यात?
उपमुख्यमंत्री असणाऱ्या राज्यांपैकी बिहार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरयाणा, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम या ७ राज्यात या टर्मला एक उपमुख्यमंत्री कार्यरत आहे.
उत्तरप्रदेश मध्ये केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, मेघालय राज्यात प्रीस्टोन टायन्सॉगं आणि स्नीवभलंग धर, महाराष्ट्रात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, नागालँड मध्ये यान्थुंगो पॅटन आणि टीआर झेलियांग अशा ४ राज्यांत या टर्मला एकावेळी २ उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत.
आंध्रप्रदेशात वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात सध्या ५ उपमुख्यमंत्री आहेत. देशभरात सध्या सर्वात जास्त उपमुख्यमंत्री आंध्रप्रदेशच्या मंत्रीमंडळात असल्याचं पाहायला मिळतं.
देशात पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळालं?
१९६० साली बिहारमध्ये अनुराग सिन्हा यांची भारतात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
महाराष्ट्रात १९७८ साली पहिल्यांदा एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आतापर्यंत दोन वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. तर तब्बल ५ वेळेस उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकदाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद एखाद्या महिलेला मिळालेलं नाही. भारतात सध्या कुठल्याच राज्यात महिला उपमुख्यमंत्री नाही. बिहारमध्ये मात्र २०२० ला रेणूदेवी या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत्या.