Sambhaji Bhide : कधी महिलेच्या टिकलीवरून, कधी मूल जन्मावरून, कधी कोरोना वरून, तर कधी भारत मातेवरून सतत आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात राहणारे व्यक्ती म्हणजे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे. पूर्वी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. भिडेच्या समर्थकांमध्ये ते ‘भिडे गुरुजी’ या नावाने लोकप्रिय आहेत.
भिडे यांनी आता पुन्हा एक वादग्रस्त व्यक्तव्य करून सध्या ते चर्चेचे विषय ठरले आहेत. गुरुवार, २७ जुलैला अमरावतीच्या एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांवर आक्षेपार्ह् वक्तव्य केलं. त्यांच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राजकीय वातावरण पेटलेलं आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एव्हढंच नाही तर शुक्रवारच्या पावसाळी अधिवेशनातही या मुद्यावरून गदारोळ उठला होता. प्रचंड आक्रमक होत विरोधकांनी भिडेंच्या अटकेची मागणी लावून धरली. त्यात काँग्रेस नेते आघाडीवर दिसून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांची अटकेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, तर माजी मंत्री यशोमती ठाकूरही या मुद्द्यावर चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
(Sambhaji Bhide)भिडे नेमकं काय म्हणाले?
बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे २७ जुलैला एका कार्यक्रमा दरम्यान भिडे बोलताना म्हणाले की, “महात्मा गांधीजींचं नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगण्यात येतं. मात्र त्यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार आहे.”, असं खळबळजनक वादग्रत विधान भिडेंनी अमरावतीच्या दौऱ्यात केलं. पुढे ते असेही म्हणाले की, “करमचंद गांधी यांना ४ पत्नी होत्या आणि मोहनदास हे त्यांच्या चौथ्या पत्नीचे सुपुत्र होते. करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदारांच्या घरी काम करत होते. दरम्यान करमचंद गांधीं त्याच मुस्लिम जमीनदारांच्या इथे चोरी करून पळून गेले. हे कळल्यावर जमीनदार संतप्त झाले आणि प्रत्यूत्तर म्हणून त्यांनी करमचंद यांच्या चौथ्या पत्नीला उचलून आणलं. त्यांच्या चौथ्या पत्नीला आणल्यानंतर त्यांच्या सोबत पत्नी सारखं व्यवहार केलं. एव्हढंच नाही तर मोहनदासचा सांभाळ, शिक्षण त्याच मुस्लिम जमीनदाराने केलेलं असल्याचं ठोस पुरावेही असून मोहनदसचे खरे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार आहेत.” असा दावा भिडेंनी केला आहे.
भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर नेत्यांची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत सभागृहात म्हटले की, “काल अमरावतीमध्ये संभाजी भिडे या व्यक्तीने महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत नालस्ती आणि निंदा करणारं विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर ते बाहेर कसे फिरू शकतात. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत भिडेंना अटक केली पाहिजे.”, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
विधानसभेत २८ जुलैला आमदार बाळासाहेब थोरात यांनी भिडेंच्या वादग्रस्त व्यक्तव्यावर भिडेंची बंदोबस्त करण्याची मागणी केली. ते म्हणाले कि, “संभाजी भिडे हे विकृत व्यक्ती आहेत. त्यांनी देशाच्या राष्टपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अपमानकारक वक्तव्य केलेलं आहे. जे पूर्ण देशाला अत्यंत अस्वस्थ करणार आहे.संभाजी भिडे सतत असे वादग्रस्त विधान करत असतात. त्यांना कोण पाठीशी घालतं याचा शोध लावणं गरचेचं आहे. भिडेंना महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचा आहे हे ओळखलं पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते अशी विधान करत असतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच कारवाई करून सभागृहाला सूचित करावं. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. “
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी सभेतील गदारोळ थांबवण्यात प्रयत्न करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन, शासनाने उचित कारवाई करावी”, असे आदेश दिले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “अध्यक्षांनी आदेश दिल्याप्रमाणे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची तपासणी होईल, त्यावर उचित कारवाई होईल.”
संभाजी भिडे यांनी आतापर्यंत केलेले वादग्रस्त व्यक्तव्य
महात्मा गांधी संबंधित वादग्रस्त व्यक्तव्य करणारे संभाजी भिडे यांनी काही पहिल्यांदाच असं व्यक्तव्य केलं नाही, तर यापूर्वीही त्यांनी असे अनेक वादग्रस्त व्यक्तव्य केलेले आहेत. मग ते कधी महिलेच्या टिकलीवरून, तर कधी मुल जन्मावरून, कधी कोरोना वरून, तर कधी भारत मातेवरून… पाहुयात त्यानीं आतापर्यंत कोणते कोणते वादग्रस्त व्यक्तव्य केले आहेत?
टिकलीवरून वादग्रस्त व्यक्तव्य
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर भिडे यांच्याशी एका महिला पत्रकाराने संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकाराला उत्तर देताना म्हटले की ,”अगोदर तू कुंकू लाव तरंच तुझ्याशी बोलेन.” असं सांगून तिच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यांचं असं व्यक्तव्य करणं म्हणजे महिलांचा अपमान आहे, असं म्हणत त्यानंतर त्यांची ही व्हिडीओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली होती. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते.
भारत मातेवर वादग्रस्त विधान
लोकसंख्यावर बोलताना संभाजी भिडेंची अशीच आणखी एकदा जीभ घसरली होती. “जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी पण हिंदू ना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे, तो म्हणजे निर्लज्ज पणात. जगाच्या पाठीवरती १८७ राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरमपणाचा हा देश आहे. लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान आहे”, असे संभाजी भिडे म्हणाले होते.
कोरोना वादग्रस्त विधान
कोरोना काळात देखील संभाजी भिडेंची जीभ घसरली आणि त्यांनी विधान केले होते की,”कोरोनाने जी माणसं मरतात ती जगण्या लायक नाहीत. दारुची दुकानं उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकतोय त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चाललाय? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे. याविरोधात लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. तसंच कोरोना हा रोगंच नाहीए. हा गां*** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे.”
मुल वादग्रस्त विधान
“ज्यांना मुलं होत नसेल तर माझ्याकडचं फळ खा”, असं वक्तव्य भिडेंनी २०१८ मध्ये केलं होतं. ते म्हणाले होते की,”लग्न होऊन ८-८, १०-१०, १२-१२ वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोरं होईल. असं झाड माझ्याकडे आहे. मी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना हे आंबे खायला दिलेत. पथ्य सांगितले आणि १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली.ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर, अपत्य होते. असा हा आंबा आहे.” त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
तुम्ही हे देखील वाचू शकता,
गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.