अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केलेली एन्ट्री आणि उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ या घटनेनं राजकीय वर्तुळात सध्या वातावरण चांगलंच तापलंय. राजकारण म्हटलं की राजकीय आखाड्यातले वेगवेगळे डावपेच, सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठीच्या वेगवेगळ्या खेळी या आल्याचं… राजकारण हे काही आपल्यासारख्या साध्या माणसाचं काम नाही, असं वाक्य तुमच्या कानी कधी ना कधी पडलंच असेल… पण राजकारणाच्या पटलावर सध्या नावाजलेल्या राजकीय नेत्यांनी आपापल्या गुरूंकडून राजकीय धडे घेतले आणि आज राजकारणाच्या आखाड्यात आपले पाय घट्ट केले आहेत. कोण आहेत हे पॉलिटिकल गुरू, जाणून घेऊयात….
शरद पवारांचे पॉलिटिकल गुरु
भारतीय संस्कृतीला गुरू शिष्यांची परंपरा आहे. तसंच राजकारणातही दिग्गज नेत्यांनी आपापल्या गुरूकडूनच राजकीय धडे घेत महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविलाय…. सुरुवात करुया सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांकडून… तेल लावलेले पैलवान अशी शरद पवारांची ओळख… पक्षफुटीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या ८२ व्या वर्षी हे पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न योग्य समज आणि त्यावर योग्य उत्तर शोधून काढण्याची कला शरद पवारांनी सातारा जिल्ह्याचे मानसपुत्र दिवंगत यशवंराव चव्हाण यांच्याकडूनच अवगत झाली. अगदी पहिल्या निवडणुकीचे तिकीट मिळवतानाही याच जिल्ह्याचे पुत्र यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना सातारा जिल्ह्यात ताकद दिली. यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार राजकीय गुरू मानतात. म्हणूनच अजित पवारांच्या बंडानंतर इतका मोठा धक्का मिळाल्यानंतर शरद पवार हे आपल्या राजकीय गुरूच्या साक्षीने पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेण्याचा निर्धार केलाय.
देवेंद्र फडणवीसांचे पॉलिटिकल गुरू
सरकारच्या कुशल प्रशासनाचा तगडा अनुभव असलेले अशी ओळख असलेले देवेंद्र फडवणीस…मितभाषी, विनम्र, मनमिळावू राजकारणी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघात असल्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर राजकीय संस्कार झाले… ते इतके की त्यांच्या शाळेच्या नावात इंदिरा होतं म्हणून त्यांनी ती शाळा बदलली होती. लोकांना आकर्षित करेल असेल राजकीय कथन करण्याची शैली त्यांना जन्मजातच मिळाली. कारण त्यांचे वडील त्यावेळी आमदार होते. त्यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे. सुरुवातीला ते नितीन गडकरींना आपले गुरू मानत. पण नंतर हळूहळू गोपीनाथ मुंडे यांच्यासारखं विरोधी पक्ष नेता व्हावं अशी त्यांची आकांक्षा बनली. तरीही आमदारकीचा फॉर्म भरताना, आमदार म्हणून निवडून आल्यावर नितीन गडकरींच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. अतिशय तरूण वयात नागपूरचं महापौरपद मिळवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास अतिशय झापाट्याने झाला.
नितीन गडकरींचे पॉलिटिकल गुरू
नितीन गडकरी यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण सुरू झाली ती विद्यार्थी परिषदेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तमिळनाडूत प्रचारक असलेले दत्ताजी डिडोळकर यांनी नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बांधणी केली. गडकरींना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्या तरूण वयात दत्ताजी डिडोळकरांच्या तालमीत आणि संस्कारात आपण तयार झालो असं गडकरी अभिमानाने सांगतात. राजकारणाचे पहिले धडे देणारे दत्ताजी डिडोळकर हे त्यांचे गुरू आहे.
राज ठाकरेंचे पॉलिटिकल गुरु
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाते संपूर्ण जगाला माहितीय. गुरू शिष्याचं याहुन सुंदर नातं जगात दुसरं असू शकत नाही. राज यांना राजकारणाचे बाळकडू बाळासाहेबांनीच दिलं. ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवत मानतात. बाळासाहेब ठाकरे हे बोलायला उभे राहिले की त्यांच्या बोलण्याचं गारूड समोरच्या उपस्थितांवर होत असे. राज ठाकरे यांच्याकडेही असाच करीश्मा आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे भाषण करतात. त्यांना पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचा भास त्यांच्यात होतो. बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून एके काळी राज ठाकरेंकडेच पाहिलं गेलं. मात्र ही सूत्रं उद्धव ठाकरेंच्या हाती आली आणि त्यानंतर शिवसेनेच्या राजकारणाची दिशा कशी बदलली हे सगळ्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिलं आहे.
नारायण राणेंचे पॉलिटिकल गुरु
नारायण राणे म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं राजकीय व्यक्तीमत्त्व. अनेक राजकीय पदं भूषवलेल्या या नेत्याने महाराष्ट्राचं राजकारण अगदी कोळून प्यायलं आहे.आजपर्यंत त्यांची वाटचाल तीन पक्षातून झाली. सुरुवातीला ते शिवसेनेत होते, मग ते कॉँग्रेस मध्ये गेले आणि राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आज जरी ते भाजपमध्ये असले तरी नारायण राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाच आपले गुरू मानत आले आहेत. बाळासाहेब आणि त्यांचे शेवटपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बाळासाहेब ठाकरे माझ्या आयुष्यात आले नसते तर मी घडलोच नसतो, असं असं राणेंनी अनेकदा सांगितलंय. मतभेद झाल्यावर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला पण आजतागायत राणेंचं बाळासाहेबांवरचं प्रेम कधीच कमी झालं नाही.
एकनाथ शिंदेंचे पॉलिटिकल गुरू
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रद्धाळू राजकीय नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या कपाळावर नेहमी लाल कुंकूचा टिळा लावलेला दिसून येतो. अप्पासाहेब धर्माधिकारी हे अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असून महाराष्ट्रातील जाणते समाजसेवक आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरू मानत. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मनात असलेला आदर वेळोवेळी दिसून येत होता. तर ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असलेले दिवंगत आनंद दिघे हे त्यांचे राजनैतिक गुरू आहेत. ठाण्यात प्रचंड साखरेचा तुडवडा असताना प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन कारखान्यातून साखर आणण्याचं धोकादायक काम एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं, त्याच क्षणी एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंचं मन जिंकलं. त्यानंतर आनंद दिघेंचे पटट्शिष्य म्हणून एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये ओळख मिळाली. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली.