पुणे : वृद्ध नागरिकांचे जीवन अधिक सुखद व्हावे आणि सामाजिक व आर्थिक आव्हानांना सहजपणे तोंड देता यावे यासाठी ‘वृद्ध मित्र’ सारख्या दूरदृष्टीने राबविलेल्या अभिनव उपक्रमांची आवश्यकता आहे. सर्वांनी मिळून या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
सोसाइटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरिएंटेड ऑपरेशनल लिंक्स (स्कूल) द्वारा आयोजित ‘वृद्ध मित्र’ कार्यक्रमाच्या शहरस्तरावरील विस्तार कार्यक्रमाच्या उद्घाघटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, ‘स्कूल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बेनझीर पाटील आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.बैस म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे वयासोबत येणारे अनुभव आणि ज्ञानाचे भांडार आहेत. समाजावर त्यांचे असलेले ऋण लक्षात घेता ते आदर आणि सन्मानास पात्र आहेत. देशात २०५० पर्यंत वृद्धांची संख्या ३१ कोटीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. वृद्ध साधारणत: अर्थार्जनाचे काम करत नसल्याने त्यांना गंभीर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे ओझे म्हणून पाहणे किंवा त्यांची कुटुंबात होणारी उपेक्षा ही वेदनादायी असते.
पारंपरिक कुटुंब पद्धतीतील बदलामुळे येणारी सामाजिक सुरक्षेची कमतरता आणि एकटेपणाच्या भावनेने ही समस्या अधिक वाढते. पेन्शन घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पौष्टिक आहार, आरोग्यसेवा, औषधे घेण्याची समस्या त्यांच्यासमोर असते. अशावेळी त्यांना समाजाकडून प्रेमाची आणि सहकार्याची आवश्यकता असते. हे कार्य ‘वृद्ध मित्र’ सारख्या संस्था करीत आहेत. अशा प्रकारच्या प्रयत्नांची गरज प्रत्येक स्तरावर आहे, असे राज्यपाल म्हणाले.
समाजातील वृद्ध व्यक्तींना जीवनाच्या या टप्प्यावर भावनात्मक, सामाजिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता असते. त्यादृष्टीने ‘वृद्ध मित्र’ हा ‘स्कूल’ संस्थेचा अभिनव उपक्रम आहे. वृद्धांच्या घरी जावून आवश्यक सेवा देणे ही सर्वोच्च सेवा आहे. प्रत्येक रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र युनिट असणे, त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ही आजची गरज आहे. यासोबतच घरातील वृद्ध हे ओझे नाही तर आशीर्वाद आहे हे तरुणांनी समजून घेण्याचीही गरज आहे.
गृहनिर्माण संस्थांमध्ये वृद्ध व्यक्तींची देखभाल करण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घ्यायला हवा. स्कूलसारख्या संस्थांनी शासनाकडे वृद्ध व्यक्तींसाठी धोरण जाहीर करण्यासाठी आग्रह धरावा. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असलेला ‘वृद्ध मित्र’ हा अभिनव उपक्रम सर्व ठिकाणी राबविला जावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री.बैस यांनी व्यक्त केली.
मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि पुणे शहराला वृद्ध व्यक्तींसाठी अनुकूल शहर बनविण्याचा ‘स्कूल’ संस्थेचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून इतरही रुग्णालयात ‘स्कूल’च्या सहकार्याने असा कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. बेनजीर पाटील म्हणाल्या, वृद्धांना सन्मानजनक, अनुकूल जीवन जगता यावे यासाठी संस्था काम करीत आहे. २८ हजार वृद्धांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे. यातील ८ टक्के वृद्ध एकटे रहात आहेत. उपक्रमांतर्गत वृद्धांना विविध सुविधा दिल्या जातात. विविध सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवकांचे यासाठी सहकार्य मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यपाल महोदयांच्या हस्ते ‘वृद्ध मित्र’ उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या संस्थांचा आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.