पुणे : पुण्यातील देवाच्या आळंदीत हिमनदी अवतरली हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण इंद्रायणी नदीत तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणारी इंद्रायणी अक्षरशः फेसाळली आहे. वारकरी अन स्थानिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. याला नेमके कोण जबाबदार आहेत असा प्रश्न आता विचारला जातोय.
इंद्रायणी नदीत साबणासारखा फेस वाहणं हे नित्याचंच झालंय. पिंपरी चिंचवडमधील विनापरवाना चालणाऱ्या शेकडो कंपन्या या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. ज्या कंपन्या रसायनयुक्त पाणी या नदी पात्रात सोडतात, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत.