गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या (ShivSena) 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील (16 MLAs disqualification case) निर्णय प्रलंबित आहे. याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच पडली आहे, कारण 16 आमदारांच्या अपात्रेबाबतची सुप्रीम कोर्टातील सुनावणी (Supreme Court hearing) आता पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. पुढील सुनावणी आता 18 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आमदारांच्या अपात्रेची सुनावणी लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. तर शिंदे गटाला मात्र यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलल्याने शिंदे गटाला आणखी दीड महिन्याचा कालावधी मिळाला आहे.
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत पक्षात बंड केलं होतं. त्यावेळी शिंदेंसह काही आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले होते. त्यादरम्यान शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 15 आमदारांनी पक्षाचा व्हीप न पाळल्याबाबत उद्धव ठाकरे गटाकडून 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून हा निर्णय प्रलंबितच आहे.
यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. त्यामुळे हे प्रकरण अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात गेलं. परंतु, याबाबत निर्णय देण्यास नार्वेकर विलंब करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी नवीन याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली.
सुनील प्रभूंनी याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. ज्यावर 31 जुलै रोजी सुनावणी पार पडणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तर आता ही सुनावणी थेट 18 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.