राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेऊन नऊ दिवस झाले, पण खातेवाटपाचा (Maharashtra Cabinet Expansion) अजून काही पत्ता नाही. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने आता तीन पक्षांची आघाडी झाली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडे कोणते खाते जातील, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अजूनही खातेवाटपाला विलंब का होतोय, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
2 जुलै रोजी राष्ट्रवादीत अभूतपूर्व बंड झालं आणि पक्षातील अजित पवार गट वेगळा होऊन सत्तेत सहभागी झाला. यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला, तसेच पक्षातल्या इतर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी आपण कोणत्या गटात जायचं याचा मार्ग निवडला. तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील बंडाचं आव्हान घेतलं असून महाराष्ट्र दौरा करण्यास सुरुवात केली आहे.
खातेवाटपावरून रस्सीखेच
राष्ट्रवादीतील बंड, 9 मंत्र्यांचा शपथविधी आणि त्यानंतरचं राजकीय नाट्य या घटना घडून आता एक आठवडा उलटला. तरी खातेवाटपाला मुहूर्त मिळाला नाही. यामागे असणाऱ्या कारणांपैकी एक म्हणजे खात्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याचं समजतंय. अमुक अमुक खाती आपल्याकडे असायला हवी, अशी अपेक्षा तिन्ही पक्षांना आहे. पण शिंदे-भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादीनेही एन्ट्री केल्याने आता वाट्याला येणारी मंत्रिपदं कमी होणार आहेत, त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं सांगितलं जातंय.
राष्ट्रवादीला मिळणार अर्थ खाते
सध्या अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, मात्र राष्ट्रवादीच्या येण्याने हे खाते अजित पवारांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु, राष्ट्रवादी आपल्या सोबत नको, असं म्हणत महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला शिंदे गट आता त्याच राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादा अर्थमंत्री असल्याने ते निधी वाटपात दुजाभाव करतात असा आरोप शिंदे गटातल्या अनेक आमदारांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडे अर्थमंत्री पद जाऊ नये, अशी शिंदे गटाची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या एकमताने अजित पवारांनाच अर्थमंत्री पद दिलं जाणार असल्याचं समजतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण, ग्रामविकास, सामाजिक न्याय यासारखी महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यापैकी अर्थ खाते अजित पवारांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही आता मान्य केलं आहे. तर त्यांच्या शिवसेनेतील आमदारांची देखील समजून त्यांनी काढली असल्याचं सांगण्यात येतंय. पण इतर खात्यांवरून अजूनही बोलणी सुरू आहेत. तसंच खातेवाटप पूर्ण झाल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचंही समजतंय. त्यामुळे खातेवाटप कधीपर्यंत होतंय याची उत्सुकता लागली आहे.