BMC on Marathi Patya : सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) सगळ्याच दुकांनावर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरुनच जागोजागी मराठी पाट्या लावल्या जात आहेत. पण काही ठिकाणी या आदेशाची अमंलबजावणी केलीली दिसत नाहीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. (BMC on Marathi Patya bmc inspection of 3269 shops and establishments in mumbai after supreme court)
या निर्देशांची अंमलबजावणी देखरेख / तपासणी करण्याकामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागातील दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार व सुविधाकारांच्या पथकांनी मंगळवारी 3 हजार 269 दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. तसेच, मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात 3 हजार 93 पाट्या आढळले. तर, सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देश या आधारे पालन नसलेल्या 173 दुकाने व आस्थापनांवर नियमाधीन कारवाई करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवार 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपली. साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटी असल्याने पाट्यांबाबतची तपासणी कारवाई मंगळवार पासून सुरु करण्यात आली आहे.
हे ही वाचा – Pooja Sawant Fiancé Reveal: अखेर आता पूजा सावंतने दाखवला आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील तरतुदी यांचा भंग करणाऱ्यांना सर्वप्रथम तपासणी पत्र सोपवण्यात येईल. तसेच, माननीय न्यायालयाकडून या दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये कार्यरत प्रति व्यक्ती रुपये दोन हजार याप्रमाणे आणि जास्तीत जास्त रुपये एक लाख या मर्यादेत दंड केला जाईल, असेही महापालिकेने सांगितले. तसेच, सातत्याने नियमभंग केला आहे तर, प्रतिदिन रुपये दोन हजार प्रमाणे दुकानदार व आस्थापनांवर आर्थिक दंड होऊ शकेल, असेही महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.