सध्या सोशल मीडियावर एका व्हेल माशाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत व्हेल मासा समुद्राच्या किनाऱ्यावर अडकून पडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आणि तेव्हापासूनच बचाव कार्य हाती घेऊन या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरु झाले.
सोमवारी, 13 नोव्हेंबर अरबी समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल मासा समुद्र किनाऱ्वार आला. तसंच हा मासा बोटक्लबच्या सदस्यांनाही पाहिला आणि मग तातडीनं त्याला वाचवण्यासाठी पावलं उचलली गेली. वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतके या माशाचे वजन असल्या कारणानं व्हेल माशाचं पिल्लू वाळूत रुतून बसलं होतं.
सोमवारपासून या बचाव कार्यात पर्यटक, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीव रक्षक होते. त्यांच्या साहाय्यतेमुळेच माशाला समुद्रामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान ओहोटी असल्यामुळे या कार्यात अनेक अडथळे निर्माण झाले. हे बचावकार्य रात्रभर सुरु होते.
रात्री ओहोटीच्या वेळी या माशाला दोरीने बांधलं आणि बोटीने ओढून खोल समुद्रात नेण्यात आलं. अखेर, ४० तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात आलं आहे.