Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ज्या काळात झाला, त्या काळात जाती व्यवस्था फार कठोर होती. सवर्ण लोक दुसऱ्या जातीतल्या लोकांची सावली पण पडू देत नव्हते आणि फार तुच्छ वागणूक देत होते. या जाती व्यवस्थेचे चटके अण्णाभाऊंनाही अगदी बालवयातच सोसावे लागले होते.
शाळेत गेल्यानंतर त्यांना वर्गातही बसू दिले जात नव्हते आणि त्यामुळेच केवळ दीड दिवस ते ही वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकले. शाळेविनाच त्यांनी लिहिलेलं साहित्य पाहिलं तर आश्चर्य वाटेल. त्यांच्या लेखणीतून कष्टकरी, उपेक्षित वर्गाच्या वेदना त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत.
(Annabhau Sathe) अण्णाभाऊ आणि जातीय चटके
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. मांग समाजातील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव तुकाराम भाऊराव साठे असं आहे. केवळ शाळेतच नाहीतर कामगार हा देखील केवळ एक वर्ग नसून कामगारांचीही एक जात असते, याचा त्यांना अनुभव मोरगाबच्या गिरणीत काम करत असताना आला.
ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली त्या ठिकाणी त्यांना तुटलेले धागे पुन्हा जोडणयासाठी धागे तोंडातली थुंकी लावून जोडावे लागत होते. तेथील कामगारांना जेव्हा अण्णाभाऊंची जात कळली तेव्हा त्यांच्या थुंकीने बाटलेल्या धाग्याला आम्ही हात लावणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. परिणामी त्यांना हे काम सोडावं लागलं.
मात्र सतत सोसावं लागणाऱ्या जाती आणि वर्गाच्या चटक्यांनी त्यांचं मन आतून खळबळत होते आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या विद्रोही लेखनातून पहायला मिळते.
मुंबईत अण्णाभाऊंचं आगमन
अण्णाभाऊ वयाच्या १२ व्या वर्षी म्हणजे १९३२ ला वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी केले. मग कोळसे वेचणे असो की फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे असो की… किंवा मग मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी असो, अशी अनेक काम त्यांनी केली.
अण्णाभाऊंचा कम्युनिस्ट पक्षात प्रवेश
मुंबईतील कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्त्वातील चळवळीकडे अण्णाभाऊ आकर्षित होऊन त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. अण्णाभाऊमधील लपलेले साहित्यिक ओळखून कम्युनिस्ट नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित करत त्यांना शिक्षण घेण्यास आग्रह केला. त्यांच्या आग्रहाला मान देत अण्णाभाऊ यांनी शिक्षण घेतले आणि त्यांच्या सभोवतालचे वास्तव त्यांच्या लेखणीतून मांडले. १९४४ ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय लोकशाहीर झाले.
अण्णाभाऊ साठे यांची ओळख
अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर, बहुआयामी शाहीर, साहित्यकार, समाजसुधारक, कम्युनिस्ट, आंबेडकरी विचारवंत आदी नावाने ओळखले जातात. नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त अण्णाभाऊ साठेंमुळेच तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये अण्णाभाऊंच्या शाहिरीचे मोठे योगदान आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य
अण्णाभाऊंनी लिहिलेल्या साहित्यांनी मराठी जनतेचे ७ दशकाहून अधिक काळ प्रबोधन आणि मनोरंजन केले आहे. अण्णाभाऊ साठेंनी लोकनाट्य, छक्कड, नाटक, कथा, लावणी, पोवाडा, गीते आणि कादंबरी अशी विविध कलाप्रकार आणि साहित्याचे प्रकार हाताळले होते. अण्णाभाऊंनी १४ लोकनाट्य, १ नाटक, ११ पोवाडा,३२ कादंबऱ्या, १४ कथा संग्रह, आणि १ प्रवास वर्णन लिहिलं आहे. “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली” या त्यांच्या प्रसिद्ध गीतांमागे राजकीय अर्थ होता. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील १ मे १९६० ला स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्थापनेत संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही. म्हणून अण्णाभाऊंनी हे गीत लिहिले होते.
अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवर चित्रपट
अण्णाभाऊ यांच्या ‘वैजयंता’, ‘आवडी’, ‘माकडीचा माळ’, ‘चिखलातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’, ‘अलगूज’ आणि ‘फकिरा’ या गाजलेल्या वास्तवदर्शी कादंबऱ्यांवर ‘वैजयंता’, ‘टिळा लावते मी रक्ताचा’, ‘डोंगरची मैना’, ‘मुरली मल्हारी रायाची’, ‘वारणेचा वाघ’ आणि ‘फकिरा’ हे चित्रपट चित्रित होऊन प्रदर्शित झालेले असून यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं आहे.
अण्णाभाऊंचा आणि रशिया
रशियात साम्यवादी विचारधारेचे राज्य आल्यानंतर ‘तिथल्या साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे’ हे साम्यवादाचे सूत्र रशियात प्रत्यक्षपणे लागू करण्यात आले होते. त्यामुळे अण्णाभाऊंच्या मनात रशियाविषयी कुतूहल निर्माण झाले होते. त्यांच्यासाठी रशियातील जीवन म्हणजे त्यांना भारतीय जनतेसाठी हवं असणारं त्यांच्या स्वप्नातलं जीवन असून हे जीवन रशियातही लोक कसं जगात असेल, तिथे कसं वातावरण असणार? आदी प्रश्न त्यांच्या मनात असून त्याना रशियाला भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. पुढे त्यांनी रशियाला भेट देखील दिली आणि ‘माझा रशिया प्रवास’ असे प्रवासवर्णन ही प्रकाशित केलेलं आहे.
रशियाच्या आकर्षणामुळेच त्यांनी रशियन क्रांतीवरील पुस्तकं, लेनिन यांची पुस्तकं तसंच रशियन साहित्यीकांनी लिहिलेली विविध पुस्तकं त्यांनी वाचून काढली. त्यांच्या या सर्व विचारमंथनातून त्यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी झालेल्या स्टालिनग्राडच्या लढाईवर ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ देखील लिहिला होता. या युद्धात रशियन सैन्याने जर्मनीची नाझी सैन्याला माती चारली. मात्र अण्णाभाऊंच्या मते ही लढाई केवळ दोन देशातील नव्हे तर दोन विचारधारेंचे प्रतिनिधित्व करणारी होती. त्यामुळे ‘दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण’ असे या युद्धाचं वर्णन त्यांनी त्यांच्या पोवाड्यात केलं. हा पोवाडा रशियन भाषेत देखील अनुवादित करण्यात आला आणि रशियान लोकांना तो प्रचंड आवडला.
रशियामध्ये उभारला पुतळा
रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मॉस्कोतील रुडमिनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेनं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला आहे.
हे देखील वाचा ,
अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांनी पंडित नेहरूंना कोणती विनंती केली होती?