राष्ट्रवादीच्या (NCP) अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देताच अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री तर झालेच शिवाय राज्याची तिजोरी सुद्धा पुन्हा त्यांच्याकडेच गेली. मात्र यावरून शिंदे गटात धुसफूस असल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर जाहीररीत्या आपली नाराजी बोलून दाखवली होती. यामागे जी भीती होती तीच आता खरी ठरताना दिसत आहे. अजित पवार त्यांच्या आमदारांना भरभरून निधी देत असल्याचं समजतंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केलं तेव्हापासून शिंदे गटातील अनेक आमदार अजित पवारांवर आरोप करत होते. महाविकास आघाडीत असताना अजित पवार हे अर्थमंत्री होते, मात्र ते राष्ट्रवादीच्या आमदारांनाच अधिक निधी देतात. शिवसेना आमदारांसोबत दुजाभाव करतात, असा दावा शिंदे गटाने केला होता. तसंच त्यांच्यामुळेच आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो अशी कबुलीही शिंदे गटाने दिली होती. मात्र आता पुन्हा अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून अर्थ खातंही त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय.
जे नको होतं तेच घडलं
आधीच अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाची गोची झाली होती. त्यात अर्थ खातं राष्ट्रवादीला देऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाची होती. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर याबाबत आपली भूमिका मांडली होती. परंतु, पुन्हा एकदा अर्थ खातं अजितदादांकडे गेलं आणि जे नको होतं तेच घडलं. अर्थ खात्याचा पदभार स्वीकारताच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना भरभरून निधी द्यायला सुरुवात केली आहे.
निधीवाटपावरून शिंदे गटाला अडचण?
राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीसह शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार समर्थक आमदारांना अधिक निधी मिळाला असल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गटावर पुन्हा अन्याय होतो आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फडणवीसांचं स्पष्टीकरण
दरम्यान, यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, “भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनाही निधी देण्यात आला आहे. केवळ अजित पवार समर्थकांनाच निधी देण्यात आला आहे, असे म्हणणे योग्य नाही”, असं फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.