एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले, तर दुसरीकडे राज्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली होती. त्यातच राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला आहे. अजित पवारांचा वाढदिवस याचं निमित्त ठरलं आहे. आज (22 जुलै) अजितदादांचा 64 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे माझा वाढदिवस साजरा करू नका, अशी घोषणा अजित पवरांनी केली होती. मात्र तरीही अनेक ठिकाणी त्यांचे होर्डिंग्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर अनेकांनी सोशल मिडियावर देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लवकरच अजितपर्व
अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय आपल्या मनातील इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. पण यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मिटकरींनी या ट्वीटमध्ये “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व” असं लिहिलं आहे. मिटकरींचं ट्वीट म्हणजे पुन्हा नवीन राजकीय भूकंप का? अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा
खरंतर अजित पवारांना देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. तसं त्यांनी जाहीररीत्या बोलूनही दाखवलं आहे. शिवाय ज्यावेळी अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हाही लवकरच अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेल, अशी चर्चा रंगलेली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.