राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar on Sharad Pawar) हे आतापर्यंत केवळ नाराज आहेत, अशा चर्चा कानी पडायच्या. पण आता मात्र पहिल्यांदाच अजित पवारांनी आपल्या मनातील खदखद, राग, सल सगळंच बाहेर काढलंय. स्पष्टवक्ते असलेले अजितदादा यावेळी प्रथमच आपल्या काकांवर बरसलेत. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल करत त्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. (Ajit Pawar vs Supriya Sule)
राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटानंतर आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे शरद पवारांच्या समर्थकांनी अजित पवार गटावर टीका केली, तर आता अजित पवार गटाकडूनही थेट शरद पवारांवर निशाणा साधला जातोय. एवढंच नाही तर अजित पवार आणि त्यांचा गट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे ‘दादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाही’, असं ठामपणे सांगणाऱ्या सुप्रिया सुळेच अजितदादांच्या वाटेतल्या काटा ठरत होत्या का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
आज (5 जुलै) झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या राजीनामासत्रावर रोखठोक भाष्य केलं. तुम्ही 83 वर्षांचे आहात, आता तरी थांबणार आहात की नाही? असा थेट निशाणा अजित पवारांनी शरद पवारांवर साधला. “साठीनंतर सर्वच निवृत्त होतात. पण तुम्ही अजूनही निवृत्त होण्याचं नाव काही घेत नाही. आता निवृत्त व्हा, आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. काही चुकलं तर आमचे कान पकडून दुरुस्त करा. पण तुम्ही अजूनही अध्यक्ष पद सोडत नाहीत. हे का आणि कशासाठी केलं जातंय? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का?”, अशा कठोर शब्दात अजित पवारांनी शरद पवारांसह सुप्रिया यांना लक्ष्य केलं.
अजितदादांचं शरद पवारांना खुलं आव्हान
यावेळी अजित पवारांनी शरद पवारांना फक्त खडेबोलच सुनावले नाहीत तर पवारांना ओपन चॅलेंज सुद्धा दिलंय. जर पवार साहेबांनी आंबेगावात सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांत सभा घ्यावी लागेल, असं जाहीर करत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. अजित पवार यांच्या बंडाने पक्ष फुटला असून त्यांना 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येतोय. अशातच आता प्रत्येकजण आपापल्या भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. कुठल्या गटात जायचं हे ठरवताना स्पष्टीकरण देत आहेत. मात्र, यामध्ये अजित पवार गटात गेलेले आमदार प्रामुख्याने शरद पवार यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.
“अजित पवारांवर अन्याय”
काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी आपली लेक सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आणि लगेचच अजितदादांच्या नाराजीचं नवं सत्र सुरू झालं. शरद पवारांच्या या निर्णयाने अजित पवारांना डावलण्यात आलं, त्यांच्यावर अन्याय झाला असं आता अजित पवार गटाकडून सांगण्यात येतंय. इतक्या दिवसांची मनातील सल आमदार आता बोलून दाखवत आहेत.
आज (5 जुलै) दोन्ही गटाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपापल्या भाषणातून आपलं मत मांडलं. यावेळी अजित पवारांचे समर्थक धनंजय मुंडे यांनी अजितदादांवर अन्याय झाला असल्याचा दावा केला. अजितदादांना अनेकदा मान खाली घालावी लागली, त्यांचा सर्वात जास्त अपमान झाला, असा हल्लाबोल मुंडेंनी केला. मुंडेंनी अन्याय झाल्याचं म्हंटलं, तर छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या कार्याध्यक्षपदाच्या निवडीवरच बोट ठेवलं.
“सुप्रिया सुळेंवर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी का?”
एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केल्याने नाराजी वाढली का? असा प्रश्न विचारताच भुजबळ यांनी म्हंटले की, “पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असून प्रत्येकात क्षमता आहे. मी देखील ज्येष्ठ आहे. मात्र इतर सर्वांना डावलून सुप्रिया यांना जबाबदारी का दिली?”, असा सवाल करत यामुळेही आमदारांची नाराजी असू शकते, असं उत्तर भुजबळ यांनी दिलं.
दरम्यान, सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या टोकाच्या निर्णयाने निराश झाल्या आहेत. अजितदादांच्या या निर्णयाचं आश्चर्य नाही, तर धक्का बसला, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तर आपल्यात आणि भाऊ अजित पवार यांच्यात कधीच स्पर्धा होणार नाही, असं मोठ्या विश्वासाने सांगणाऱ्या सुप्रिया सुळे याच आपल्या भावाच्या वाटेत अडथळा ठरल्या असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.