Mysterious Virus Infection in China: कोरोना महामारीतून जग सावरत आहे. कोरोनामुळे सगळ्याच स्तरांवर मोठा फटका बसला होता. आता सगळंकाही पूर्वपदावर येत असताना आता नवीन साथीचा रोग पसरत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आणि हा साथीचा रोग कोरोनाप्रमाणेच चीनमधून आला आहे. दिवसेंदिवस या रोगाचा फैलाव वाढत असल्याचे सांगितलं जात आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे. (Mysterious Virus Infection in China outbreak in china)

लक्षणं काय?
चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता कुठे कोरोनाच्या धक्क्यातून सावरु लागली आहे. असं असतानाच आता कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात होती तशी परिस्थिती निर्माण होणार की काय अशी भीती पुन्हा चिनी लोकांच्या मनात डोकवू लागली आहे. खरं तर चीनमध्ये वेगाने पसरत असलेला हा संसर्ग निमोनियासारखा आहे. मात्र या आजाराची लक्षणं निमोनियासारखी नाहीत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या मुलांच्या फुफ्फुसांना सूज येते. संसर्ग झाल्यानंतर मुलं तापाने फणफणू लागतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
शाळा बंद करण्याची तयारी
निमोनियासारख्या या रहस्यमयी आजाराने ग्रासलेले रुग्ण चीनच्या ईशान्य बिजिंग आणि लियाओनिंगच्या रुग्णालयांमध्ये आहेत. रुग्णांची संख्या एवढी आहे की रुग्णालयातील सेवांवर आतापासूनच तणाव पडू लागला आहे. संसर्गाचं प्रमाण दिवसोंदिवस वाढत असल्याने सरकारने आता थेट शाळा बंद करण्याची तयारी पूर्ण केली असून कोणत्याही क्षणी तशी घोषणा होऊ शकते. या संसर्गासंदर्भात एका ओपन-अॅक्सेस ऑब्झर्व्हर असलेल्या ‘प्रोमेड’ने जगभरातील देशांसाठी इशारा जारी केला आहे. जगभरातील प्राणी आणि मानवामध्ये होणाऱ्या विषाणूंच्या संसर्गासंदर्भातील समस्यांवर लक्ष ठेऊन असलेल्या या गटाने हा संसर्ग प्रामुख्याने लहान मुलांना होतो असं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) हवीय माहिती
जागतिक आरोग्य संघटनेनं या संसर्गासंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर चीनकडे सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबद्दल चीनने 13 नोव्हेंबर 2023 रोजी स्थानिक प्रसारमाध्यमांना कळवलं होतं अशी माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेनं चीनला या संसर्गासंदर्भातील प्रकरणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अधिक माहिती पुरवावी असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.