बार्बी की ओपेनहायमर? (Barbie vs Oppenheimer) देशभरात हीच चर्चा सुरु आहे. बार्बी तर आपण लहानपणापासून पाहत आलोय किंवा त्या कॅरॅक्टरविषयी आपल्याला माहिती आहे. पण हे ‘ओपेनहायमर’ काय प्रकार आहे? आणि त्याची एवढी चर्चा का होते आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हा हॉलिवूडचा सिनेमा आहे हे आता सर्वांनाच माहीत झालं आहे. पण भारतातही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते आहे. जशी क्रेझ आहे तशीच या चित्रपटाच्या तिकिटाचे दर देखील कमालीचे आहेत.
देशभरातील मल्टिप्लेक्समध्ये दोन हजाराहून अधिक रुपयांना या चित्रपटाची तिकिटं विकली जात आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी सर्वांना कुतूहल वाटणं साहजिकच आहे. पण हा सिनेमा ‘आयमॅक्स’ (IMAX) थिएटरमध्येच पहा, असंही सुचवण्यात येतंय. पण आयमॅक्सच का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे आयमॅक्स म्हणजे नक्की काय हेच या लेखातून समजून घेणार आहोत. शिवाय आयमॅक्समध्ये सिनेमा पाहणं आणि सामान्य थिएटरमध्ये सिनेमा पाहणं यात काय फरक असतो हेही समजून घेऊयात.
Oppenheimer प्रदर्शनापूर्वीच चर्चेत
अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर (J. Robert Oppenheimer) या शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित असलेला या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच कमालीची लोकप्रियता मिळाली. त्यामुळे हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाचं कथानक तर खास आहेच, पण हा चित्रपट जगप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) यांचा हा चित्रपट असल्यानेही तो विशेष चर्चेत आहे. याशिवाय या चित्रपटाचं आणखी एक खास कारण म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेला कॅमेरा. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयमॅक्स कॅमेराने चित्रीकरण केलं आहे.
IMAX म्हणजे काय?
आयमॅक्स हे एक प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान असून यात 70 MMचे उत्तम रेझ्युलेशन मिळते. हे तंत्रज्ञान आयमॅक्स कॉर्पोरेशन या कॅनेडियन कंपनीने विकसित केलं असून त्याची स्थापना 1967 मध्ये झाली. तर Image Maximum या शब्दावरून IMAX हा शब्द आला असल्याचं सांगितलं जातं. IMAX कॅमेर्याने शूट केलेले चित्रपट हे सामान्य चित्रपटांपेक्षा कसे वेगळे आहेत हे समजण्यासाठी अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर यशराज फिल्म्सचा ‘धूम 3’ हा चित्रपट. धूम 3 जर का तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या चित्रपटासाठी स्क्रीन कसं वापरण्यात आलेलं. धूम 3 हा आयमॅक्स फॉरमॅटमध्ये बनलेला पहिला हिंदी चित्रपट आहे. याशिवाय एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा आयमॅक्स कॅमेरानं करण्यात आलं होतं. IMAX मध्ये चित्रपट पाहणं म्हणजे प्रेक्षकांना एक नवीन आणि उत्तम क्वालिटीचा अनुभव घेता येतो. पण
आयमॅक्समध्ये आणि इतर थिएटर्समध्ये फरक काय?
आयमॅक्समध्ये आणि इतर सामान्य थिएटर्समध्ये बराच फरक असतो. सर्वसामान्य थिएटर्सच्या तुलनेत आयमॅक्समध्ये आपल्याला मोठ्या पडद्यावर आणि उत्कृष्ट ऑडिओ सिस्टीमचा अनुभव घेता येतो. आयमॅक्स पद्धतीत हायटेक स्पीकर्स वापरल्यामुळं आपणही या चित्रपटाचाच एक भाग आहोत असं वाटू लागतं. म्हणजेच आपणही त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहोत, असा भास प्रेक्षकांना होऊ शकतो. आपणही समोरच्या दृश्याचा एक भाग आहोत असा वेगळाच अनुभव आयमॅक्समधून प्रेक्षकांना मिळतो. म्हणून बऱ्याच प्रेक्षकांना आयमॅक्समध्ये सिनेमा पाहायला आवडतं. त्यामुळेच ओपेनहायमरचा अनुभव आयमॅक्स स्क्रीनमध्येच घ्या, असं सुचवलं जातंय.