मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे 2-3 दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मात्र शुक्रवारी (14 जुलै) त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते 77 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, महाजनी हे तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावात एकटेच राहत होते. त्यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मनोरंजन सृष्टीचा एक काळ गाजवणारे रवींद्र महाजनी हे मागच्या सात-आठ महिन्यांपासून आपल्या कुटुंबाशिवाय एकटेच राहत होते. तर त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनी हा आपल्या आई, पत्नीसह सध्या मुंबईत राहत आहे. पोलिसांनी रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूचे कळवताच गश्मीर तळेगाव येथे रवाना झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजनी हे मुंबईचे रहिवासी होते. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून ते आंबी येथे भाड्याने राहत होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र दाराला आतून कडी असल्यामुळे पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. त्यानंतर पोलिसांना महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी रवींद्रचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबतची माहिती महाजनी यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
‘मराठीतले विनोद खन्ना’
रवींद्र महाजनी यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. ‘मराठीतले विनोद खन्ना’ असंही त्यांना संबोधलं जायचं. 80 ते 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी ते एक होते. इतकेच नाही तर चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत, देवता यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. देवता चित्रपटातील ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ हे गाणं बरंच गाजलं होतं. तसंच त्यातील त्यांची भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
महाजनी यांचं बालपण मुंबईत गेलं असलं तरी त्यांचा जन्म हा बेळगावमध्ये झाला. त्यांचे वडील हे एक पत्रकार होते. रवींद्र महाजनी यांना अभिनयाची आवड होती. ही आवड जपत त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि मराठीतील देखणा कलाकार अशी आपली ओळखही बनवली. ‘हा सागरी किनारा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सुंबरान गाऊ चला’, ‘निसर्ग राज्य’ यासारखी अनेक गाणी त्यांची सुपरहिट ठरली होती.