सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. कर्जतमधील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच (ND Studio) त्यांनी आत्महत्या केली आहे. ते 58 वर्षांचे होते. या घटनेमुळे मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर देखील शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी देसाईंवर 51 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कर्जतजवळील खालापूर रायगड येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (2 ऑगस्ट) नितीन देसाई यांचा मृतदेह आढळून आला. स्टुडिओतील काही कर्मचाऱ्यांना देसाई गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, याआधी एका जाहिरात संस्थेने देसाईंवर 51.7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. 3 महिने काम करून देखील देसाईंनी पैसे दिले नसल्याचं जाहिरात संस्थेचं महाणं होतं. मात्र, देसाईंनी हे आरोप फेटाळून लावले होते.
एनडी स्टुडिओ म्हणजे देसाईंचं दुसरं घर
हा एनडी स्टुडिओ देसाईंचं दुसरं घर म्हणून ओळखला जायचा. 2005 मध्ये त्यांनी मुंबईबाहेरील कर्जतमध्ये हा एनडी स्टुडिओ उभारला. साधारण 52 एकरमध्ये पसरलेल्या या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचे सेट आहेत. फक्त चित्रपटच नाही तर ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोचे अनेक सीझन देखील या एनडी स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आले होते. तर आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते स्टुडिओमध्येच होते.
4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 3 फिल्मफेअर पुरस्कार
नितीन देसाई हे मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव आहे. देसाईंनी त्यांच्या कारकिर्दीत संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी यांच्यासह अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं होतं. ‘देवदास’ (Devdas), ‘जोधा अकबर’ (Jodha-Akbar) आणि ‘लगान’ (Lagaan) यासह अनेक मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठीचे सेट त्यांनी डिझाइन केले होते. तर आतापर्यंत चार वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. शिवाय तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. यावरूनच त्यांच्या कामाचा व लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.