पुणे : पुण्यात PUNE CRIME नेमकं सुरू तरी काय आहे असाच प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण आज पोलीस निरीक्षक कराळे यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अशातच सकाळीच एक प्रौढ व्यक्ती स्वतः भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्यानी त्याची पत्नी आणि मुलगी यांची हत्या केल्याचं सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अजय तळेवाले वय वर्ष 45 याने आपली पत्नी श्वेता तळेवाले वय 40 आणि मुलगी शिरोली तळेवाले वय वर्ष 16 या दोघीजणींची निर्दयपणे हत्या केली. पत्नीची हाताची नस कापून तिचा मृत्यू होईपर्यंत उशीने तिचा श्वास कोंडला. त्यानंतर मुलीने मध्यस्थी केल्यामुळे तिचा राग येऊन तिला देखील उशीने श्वास घोटून तिचीही हत्या केली. आणि त्यानंतर स्वतः भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये येऊन हजर झाला.
पोलिसांनी सांगितले की, या दांपत्याचे सातत्याने आर्थिक कारणातून वाद होत होते. शुक्रवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं. आरोपीने पहाटेच्या सुमारास रागाच्या भरात आपल्या पत्नीची हाताची नस कापली आणि त्यानंतर तिचा मृत्यू होईपर्यंत उशिने तिचा श्वास कोंडला. त्यानंतर मुलगी मध्ये पडल्यामुळे आणि भांडणांमध्ये नेहमी ती तिच्या आईची बाजू घेते याचा राग मनात धरून तिचा देखील श्वास कोंडून तिचीही हत्या केली. किरकोळ कारणातून या आरोपीने रागाच्या भरात आपलं संपूर्ण कुटुंब उध्वस्त केले. घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.