मुंबई : गँगस्टर छोटा राजनचा निकटवर्तीय राम नारायण गुप्ता याच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court माजी पोलिस कर्मचारी प्रदीप शर्मा Pradeep Sharma यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी त्यांच्या शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात अपील दाखल केले, तर सरकारी पक्ष आणि मृताचा भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्याचा सत्र न्यायालयाचा २०१३ चा आदेश चुकीचा आणि अमान्य ठरवत रद्द बातल ठरवला. शर्मा यांच्याविरोधात उपलब्ध असलेल्या सबळ पुराव्यांकडे कनिष्ठ न्यायालयाने दुर्लक्ष केले होते. नेहमीच्या पुराव्यांच्या साखळीतून त्याचा या प्रकरणातील सहभाग स्पष्टपणे सिद्ध होतो. असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

शर्मा यांनी तीन आठवड्यांत संबंधित सत्र न्यायालयात शरण यावे, असे आदेश खंडपीठाने दिले. उच्च न्यायालयाने पोलिसांसह १३ जणांना सुनावलेली शिक्षा व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली असून अन्य सहा आरोपींची शिक्षा व जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या हत्येप्रकरणी १३ पोलिसांसह २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करून २१ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २१ आरोपींपैकी दोघांचा कोठडीत मृत्यू झाला.