मुंबई : शासनाच्या शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातील बँकेतून तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. चोरट्यांनी चक्क शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी कॉपी करून 47 लाखांचा डल्ला मारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातील बँकेमधून हा गैरप्रकार उघडकीस आला आहे. विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार वेळा 47 लाख 60 हजार रुपये काढले आहेत. याप्रकरणी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून जे पैसे काढण्यात आले ते नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार आणि झीनत खातून या चार जणांच्या नावावर ही रक्कम जमा झाली असल्याच समजते आहे. ही चोरी नेमकी कोणी केली हे स्पष्ट समजलं नसलं तरी आता या चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे शालेय शिक्षण विभागातून झालेली ही पहिली चोरी नसून याआधी पर्यटन विभागाच्या खात्यातून देखील 67 लाख रुपयांची चोरी झाली होती. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे.