छत्रपती संभाजीनगर : बळीराजाला आजपर्यंत आसमानी संकट कमी पडत होतं त्यामुळेच का आता बोगस बियाणांच्या विक्रीचा धुमाकूळ देखील सहन करावा लागणार आहे ? या बोगस बियाणांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणे विक्रीचा सध्या धुमाकूळ सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे बोगस कापूस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या बोगस बियाणे विक्रीचा पर्दाफाश केलाय.
यामध्ये बोगस आणि अनधिकृत 32 नग कापूस बियाणांची पाकिटे गंगापूर पोलिसांनी जप्त केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या पथकाने पाचोड पोलीस यांच्या मदतीने लाखो रुपयांची बोगस बियाणांची पाकिटे जप्त केली होती. त्यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीचा धुमाकूळ सर्रासपणे सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे.