Punjab Dakh Weather report : जून महिन्याच्या सुरुवातीला बुलडाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथे एका कार्यक्रमादरम्यान हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पावसाचा अंदाज सांगितला. “तुमच्या गावात 10 जून रोजी भरपूर पाऊस पडणार आहे. 10, 11, 12 जूनला तुमच्या इथं गुडघ्याइतकं पाणी साचलेलं राहील”, असं डख यांनी गावकऱ्यांना सांगितलं. मात्र त्यांचा हा अंदाज चुकला आहे. डख यांनी सांगितलेल्या तारखेला तर पाऊस पडलाच नाही मात्र त्या तारखेच्या आसपासही पडला नाही. या घटनेनंतर डख यांच्यावर, त्यांनी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजांवर टिका सुरु झाली. डख यांच्यावर विश्वास ठेवून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली.
यंदा राज्यात ८ जून पासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज पंजाब डख यांनी मांडला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवत राज्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली होती. पण पाऊस न झाल्याने काहींचं बियाणं करपून गेलं तर काहींना विहिरीची सहायता घेत रात्रभर पाणी घालून बियाणं वाचवावं लागलं.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पंजाब डख हे हवामान अभ्यासक म्हणुन प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार अनेक शेतकरी त्यांची शेतीची कामे ठरवतात. अनेकदा त्यांचे अंदाज अचूक आलेले आहेत. मात्र आता त्यांचे हवामानाचे अंदाज चुकत असल्याचा आरोप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून काही शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे. त्याबरोबरच डख यांना सोशल मीडियावर ही प्रचंड प्रमाणात टिकेचा सामना करावा लागत आहे.
चुकीच्या हवामान अंदाजाबाबत पंजाब डख काय म्हणतात?
डख त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देताना म्हणाले की, “माझा पावसाचा अंदाज चुकला नाही. चक्रीवादळ आलं आणि ते बाष्प घेऊन गेलं. जर का ते चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकलं असतं तर महाराष्ट्रात नक्कीच पाऊस झाला असता. राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या पेरणी आणि बियाण्यांचा तर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वत: घ्यावा, असं मी नेहमी सांगत असतो. त्या बरोबरच जमिनीत 1 इंच पर्यंत ओलावा असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं देखील मी सांगत असतो. या वेळच्या माझ्या अंदाजावर 100-200 लोक माझ्याविरोधात बोलत आहेत म्हणून काय झालं? बाकी बहुसंख्य शेतकरी अजुनही माझ्या पाठीशी आहेत.”
“माझा शास्त्रीय, नैसर्गिक आणि वातावरणाचा अभ्यास आहे. निसर्गात पाऊस येणार की नाही हे सांगणारे काही इंडिकेटर्स असतात. ते पाहून पाऊस येणार की नाही ते कळतं. मी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतो म्हणून मला केवळ पाण्याचे ढग दिसतात. माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे बघतो ते शेतकऱ्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून बघतो”, असं सांगत डख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पंजाब डख कोण ? (Who is Punjab Dakh)
डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामनगावचे रहिवासी आहेत. त्यांनी बीए, सीटीसीए आणि एटीडी असं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून 2012 ला त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र, 2017 च्या नंतर त्यावर कोर्टानं स्टे दिल्यामुळे त्यांच्या सोबत एकूण 18 हजार शिक्षक आता रिक्त पदावर आहेत.
डख यांच्याकडे 10 एकर जमीन असून 1995 पासून ते हवामानावर अभ्यास करत आहेत. विशेष म्हणजे डख हे घरचंच बियाणं वापरून बैल, गडी, मजुर या सगळ्याची मदत न घेता, निर्सगावर आणि हवामानावर आधारित शेती करतात. या शेतीतून ते सोयाबीन आणि हरभरा ही पिके घेतात, असं देखील सांगितलं जातं.
आठवीला असताना डख आणि त्यांचे वडील हिंदीमधील हवामानाच्या बातम्या पाहायचे. त्यात केवळ हिंदी आणि इंग्रजीत अंदाज सांगितला जायचा, पण तो राष्ट्रीय पातळीवर असायचा. डख यांना प्रश्न पडला की महाराष्ट्रात 42 हजारांहून अधिक गावं आहेत. त्यामुळे मग राज्यात नेमका पाऊस कुठे आणि कधी पडेल हे कसं सांगायचं? याचं उत्तर तेव्हा त्यांना मिळालं नाही. मात्र तेव्हा पासून त्यांना हवामानाचा अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली. 2002 ला परभणीला जाऊन त्यांनी ‘सीडॅक’ हा कॉम्प्युटरचा कोर्स केला. तिथं त्यांनी फक्त उपग्रहांच निरीक्षण केलं. त्यानंतर निसर्गाच्या छोट्या छोट्या बदलांवर त्यांनी अभ्यास सुरू केला.
पंजाब उत्तमराव डख यांचे सोशल मीडियावर हवामान विषयक अंदाज चांगलेच चर्चेत असतात. त्यांचं युट्युबवर ‘Panjab Dakh पंजाब डख‘ या नावाने एक चॅनल असून जवळपास २ लाख लोक या चॅनलला फॉलो करतात. आतापर्यंत डख यांनी दिडशे पेक्षा जास्त व्हिडीओ या चॅनलवर अपलोड केले आहेत. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून डख लोकांपर्यंत त्यांचे हवामानाचे अंदाज पोचवतात.
हवामान तज्ज्ञ डख यांच्या अंदाजावर काय म्हणतात?
हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांचं म्हणणं आहे की,”आपल्या देशात एकूण 36 हवामान विभाग आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 4 हवामान विभाग आहेत. हवामान विभागाची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. हवामान विभाग हा विभागानुसार अंदाज देत असतो. त्याबरोबरच दर 15 दिवसांचा अंदाज हवामान विभाग देत असतं आणि दररोज यासंदर्भातले नकाशे देखील प्रकाशित करत असते. यात OLR मॅप जो मान्सूनच्या हालचाली दर्शवत असतो तसंच INSAT CCD (सॅटेलाईट मॅप) असतो. शेतकऱ्यांनी हवामान विभागाचे हे अंदाज वाचायला शिकलं पाहिजे. कारण भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता 85 ते 90% आहे. त्यामुळे इतरांच्या भोंदूपणावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.”
एका जेष्ठ हवामान तज्ञाच म्हणणं आहे की, “हवामान विभागाचा बेसिक ज्ञान देखील नसताना हवामानाचा अंदाज जर कोणी सांगत असेल तर हे फार गंभीर आहे कारण हवामानाच अंदाज सांगणे हे फार हुशार माणसाचं काम आहे. यात वारे, ढग, तापमान, आद्रर्तेबद्दलचे ज्ञान असं गरजेचं असत. ते नसले तर, कधी वेध शाळेतही गेला नसेल तरीही अंदाज सांगत असेल तर हे लोकांसाठी फार रिस्की आहे.”
योग्य हवामानाचा अंदाज कसा बघायचा?
भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा अधिकृत मानला जातो. त्यामुळे हवामानाची योग्य माहिती हवी असेल तर, सर्व प्रथम भारतीय हवामानाच्या अधिकृत वेबसाईट इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (IMD) वर जाऊन सायक्लोन, रेन फॉल, मॉन्सून, वॉर्निंग या फोल्डरमध्ये एकूण हवामानाची माहिती दिलेली असती ती वाचावी. वॉर्निंग या फोल्डरमध्ये विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार हवामानाचा अंदाज दिलेला असतो.
स्कायमेट या खासगी संस्थेच्या युट्युब चॅनेलवर देखील हवामानाची माहिती दिलेली असते. ही माहिती हिंदी आणि इंग्रजी भाषेत देण्यात येते.