नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ९ फेब्रुवारीला संपणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज संसदेत सर्वपक्षीय बैठक पार पडली. सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दिल्लीतील संसद ग्रंथालय इमारतीत पार पडली आहे. काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी यावेळी आसाममध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेवर झालेला हिंसक हल्ला आणि राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांचा मुद्दा उपस्थित केला.
प्रमोद तिवारी म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने हेमंत सोरेन, लालूप्रसाद यादव यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआय, ईडीच्या गैरवापराचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे हे अधिवेशन या विषयांवर गाजणार आहे.