लोणावळा : जरांगे पाटील हे आपल्या सोबतच्या आंदोलकांसह MARATHA RESERVATION मुंबईमध्ये येऊ नयेत यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आज सकाळीच लोणावळ्यामध्ये जाऊन राज्य सरकारच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर कर्दड यांनी चर्चा केली. परंतु या बैठकीला यश आले नाही. दरम्यान मुंबई पुणे नवीन महामार्गावर देखील पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून जुन्या मुंबई पुणे मार्गावरून जरांगे पाटील यांनी आंदोलन पुढे सरकवावे असे सांगण्यात आले होते. तर आता आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही असा पवित्रा मुंबई पोलिसांनी घेतला असून तशी नोटीस देखील जरांगे पाटील यांना पाठवली आहे. या नोटीस बाबत जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ” मुंबईला जाण्याची हाऊस नाही, आरक्षण द्या, गावी जातो ! मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे. आम्ही मुंबईकडे जात आहोत असाच पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
दरम्यान राज्य सरकारच्या वतीने सातत्याने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचं बोललं जात आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जरांगे पाटील यांच्याशी व्हिडिओ कोफ्रन्सिंग द्वारे संवाद साधणार असल्याचं समजत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा ! तिघांपैकी एकाने येऊन तोडगा काढून जावे असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.