पुणे : पुण्यातील हिंदुत्व वादी संघटनांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मिलिंद एकबोटे म्हणाले कि, ” मोहळ हत्येचे पडसाद विचित्र प्रकारे अनेक माध्यमांद्वारे समाजात निर्माण करण्यात आले. शरद मोहोळ ह्यांची असलेली पार्श्वभूमी कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून रंगविण्यात आली तसेच त्यांचे समाजाप्रती असणारे सत्कार्य पडद्यामागेच ठेवण्यात आले. म्हणून पुण्यातील सर्व नामांकित हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते हयांच्यामध्ये प्रचंड असंतोषाचे तसेच भीतीचे वातावरण आहे.
मोहोळ यांचे असणारे स्वधर्माप्रतीचे कार्य म्हणजेच जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील कतिल सिद्दीकी याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उडविण्याची केलेली भाषा ऐकून त्याचा जेलमध्ये शरद मोहळ केलेला वध सर्वज्ञात आहे. गोरक्षा आणि अतिरेक्याला मारल्यामुळे अतिरेक्यांचा आणि धर्मांधांचा रोष शरद मोहळ यांच्यावर होत. त्यामुळे त्यांनी आर्थिक पाठबळ पुरवून मोहळ यांची हत्या केली असा आमचा संशय आहे. त्याच प्रमाणे पकडलेल्या हल्लेखोरांना व हत्येच्या कटातील सुत्रधाराच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याचा ही संशय दृढ होत आहे.
हत्येमध्ये वापरलेली विदेशी बनावटीची शस्त्रे खूप मोठ्या मोठ्या असामी ह्यात असल्याचे सुचवून जातात, त्यामुळे गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांच्या पुन्हा तपासण्या व्हाव्यात व मारेक-यांकडे अचानक आलेला पैसा, गाड्या तसेच इतर चैनीच्या वस्तू ह्या बद्दल सखोल तपासणी व्हावी अशी आम्हा सर्वांची मागणी आहे. इतक्या मोठ्या उमद्या व्यक्तीची झालेली निर्घृण हत्या ही राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात खळबळजनक घटना असून ह्या घटनेचा संपूर्ण तपास हा केंद्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवण्यात यावा ह्याची आम्ही मागणी करतो. शरद मोहोळ ह्यांचे राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम हे त्यांच्या वारकरी संप्रदायातील कार्यात, मृत्यू पश्चात केलेल्या अवयवदानात, गोशाळा उभारणीत तसेच मुलींसाठी चालू केलेल्या स्व-संरक्षण वर्ग ह्यांसारख्या अनेक माध्यमातून दिसून येते.
ह्या केस मध्ये लवकरात लवकर केंद्रातून हस्तक्षेप होऊन दोर्षीवर त्वरीत कारवाई व्हावी म्हणून महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी संघटना २८ जानेवारीला पुण्यात एक जन मोर्चा काढणार असून त्याची सुरुवात पुण्यातील किनारा हॉटेल पासून होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथे समाप्ती होईल असे सांगण्यात आले आहे. जेणे करून इथून पुढे एक ही हिंदुत्ववादी व्यक्तीची मृत्यूपश्चात अवहेलना होणार नाही. ह्याची काळजी सरकार घेईल व शरद भाऊ मोहोळ ह्यांचे मारेकरी तसेच हल्ल्यामागील सूत्रधार लवकरात लवकर पकडले जातील अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे.