नवी दिल्ली : राम मंदिरावरून देशातील राजकारण शिगेला पोहोचले आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, काँग्रेसने राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेचे निमंत्रण नाकारल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले कि, ” ज्यांची श्रद्धा आहे ते आज, उद्या आणि परवा जाऊ शकतात, पण भाजप एकच प्रश्न विचारत आहे. हे भाजपचे षड्यंत्र असून तेच प्रश्न ते वारंवार उपस्थित करत आहेत. अपूर्ण मंदिराची प्रतिष्ठापना करता येणार नाही, असे चार शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजपचा मंदिराशी काहीही संबंध नाही, त्यांना केवळ राजकारण करायचे आहे.” असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.
दरम्यान, राजकीय वर्तुळात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून अनेक वादंग निर्माण झाले आहेत. कोणाला आमंत्रण मिळाले आणि कोणाला नाही यावरून मान अपमानाचे नाट्य एकीकडे सुरु आहे. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना या सोहळ्याचे निमंत्रण भाजपच्या वतीने देण्यात आले आहे. परंतु मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे आमंत्रण नाकारले आहे.