गोंदिया : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने गोंदिया शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाचे माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर आज दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. गोंदिया शहरातील यादव चौकाजवळ तिघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गोंदियातील रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून सध्या त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोण आहेत लोकेश यादव
लोकेश उर्फ कल्लू यादव हे गोंदियाचे माजी नगरसेवक आहेत. सध्या ते समाजकार्य करत असून त्यांचे भाऊ पंकज यादव हे ठाकरे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत.
हे हल्लेखोर नेमके कोण होते ? हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला ? या सर्वप्रमुख प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या घटनेने गोंदिया शहरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरल आहे.