देशात कुठेही आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज भासल्यास ठराविक रक्कम भरावी लागते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये खरंतर आवश्यक सेवा तात्काळ मिळणे आवश्यक असते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य न पाहता अनेक ठिकणी रक्तपिशवीसाठी काहीही रक्कम आकारली जाते. ज्याचा फटका रुग्णाच्या कुटुंबियांना भोगावा लागतो. रुग्णावर आलेल्या अशा परिस्थितीचा फायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आल्याने DCGI ने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
रुग्णालयांमध्ये लाखो रुग्ण उपचार घेत असतात. यातल्या अनेक रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यामुळे हे रक्त रुग्णालयांकडून किंवा खासगी वा सरकारी रक्तपेढ्यांकडून रुग्णांना उपलब्ध करून दिलं जातं. अनेक खासगी रक्तपेढ्यांकडून रक्ताची विक्री करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून ठराविक रक्कम आकारली जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे डीसीजीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचे प्रकार समोर आल्यावर रक्त ही विकण्याची बाब नाही असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय औषध नियामक मंडळानं अर्थात DCGI ने दिला आहे.
त्यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार नाही. रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो असंही DCGI ने स्पष्ट केलं आहे. तसेच, रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया मूल्य आकारता येईल असंही DCGI ने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.