Opposition party meeting in Patna : बिहारची राजधानी पाटण्यामध्ये 23 जूनला देशभरातील विरोधी पक्षांचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिने भाजपा विरोधात रणनीती आखण्यासाठी 18 विरोधी पक्षांची बैठक घेण्यात आलीये. या बैठकीला सीएम नितीश कुमार, कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आणि इतरही नेत्यांनी हजेरी लावली होती.

मल्लिकार्जुन खरगे या बैठकीत म्हणाले की, सर्वांना एकत्र लढायचे आहे. म्हणूनच आपण एकत्र आलो आहोत. दरम्यान, भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते केटीआर यांनी सांगितले की, नितीश कुमार यांच्यावर त्यांचा आक्षेप नाही पण काँग्रेसचा पाठिंबा ते स्वीकारणार नाही. शरद पवार म्हणाले की, देशातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेतली गेली. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे म्हणाले की, मी तुम्हाला आवाहन करतो की मतभेद असले तरी एकत्र या आणि देश आणि लोकशाहीच्या बाजूने काम करा. राहुल गांधींनी जे सुरू केले ते आपण पुढे नेले पाहिजे.
छोटे-मोठे मतभेद विसरून पुढे जाऊ : राहुल गांधी
त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक पक्षाला फोन करून बोलू आणि छोटे-मोठे मतभेद विसरून पुढे जाऊ. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कलम 370 हटवण्याच्या भूमिकेबाबत आपले म्हणणे मांडले. केजरीवाल यांना पाठिंबा द्यावा असे त्यांनी काँग्रेसला सांगितले. बैठकीला आलेले नेते म्हणाले की, आम्ही सर्व मिळून भाजपचा पराभव करू. पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यातील काँग्रेसवर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.

कोणत्या नेत्यांनी बैठकीला लावली हजेरी?
या बैठकीला बिहारचे सीएम नितीश कुमार, कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, RJD कडून तेजस्वी यादव, शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आणि इतरही नेत्यांनी हजेरी लावली होती.
बैठकीला पाटण्यात 15 पक्षांचे नेते उपस्थित (Patna Opposition meeting party list)
शिवसेना (ठाकरे), आम आदमी पार्टी, डीएमके, टीएमसी, जेडीयू, आरजेडी, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, सपा, जेएमएम आणि एनसीपी.