रत्नागिरी : गणपतीपुळ्याच्या Ganapatipule समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेलचा Baby whale अखेर मृत्यू झाला आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबरला सकाळी गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला होता. त्या नंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले होते पण दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी फिरलं, मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू तिथेच अडकून पडलं. अवाढव्य वेबी व्हेलला पुन्हा समुद्रात लोटण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. माशाला समुद्रात सोडण्यासाठीचे स्थानिकांसह प्रशासनाचे प्रयत्न तब्बल 40 तास सुरू होते. अखेर 40 तासांनंतर या प्रयत्नांना यशही आलं होतं. पण काय झालं, कुणालाच नाही कळलं आणि पुन्हा एकदा बेबी व्हेल किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर आला आणि अखेर त्यानं मृत्यूसमोर हात टेकले.
व्हेल मासा जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडे येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू शकतात. त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात. त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या थरामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात.
हे वाचलेत का ? अखेर 40 तासांच्या प्रयत्नानंतर व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यात यश
अशावेळी गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडलेल्या व्हेलच्या पिल्लाला त्वचेखालील चरबीच्या थराचं तापमान पाण्याबाहेर प्रचंड वाढून, त्वचा सुकून जाण्याचा धोका होता. यामुळे शरीराचे अंतर्गत तापमानही खूप वाढतं आणि डिहायड्रेशन होऊन माशाचा मृत होण्याचा धोका अधिक होता. पण त्याची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवल्यानं हा धोका कमी करता आला. तसेच, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचाही बेबी व्हेलला उपयोग झाला. त्यामुळेच तो एवढे दिवस किनाऱ्यावर तग धरू शकला.