यंदाही सालाबादप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग येथे पवार कुटुंब एकत्र आलं आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या या फॅमेली गेट टू गेदरला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यंदा अनुपस्थित आहेत. शनिवारीच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. याच वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेकांना सर्वात आधी शरद पवार आणि अजित पवार हे यंदाच्या दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न पडला होता. या काळात अनेक चर्चांना उधान आलं होतं. मात्र अजित पवार मिसिंग होते. असं असलं तरीही अजित पवार यांनी रात्री पाडव्याच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली. सुप्रिया सुळेंनी हा फोटोही पोस्ट केला आहे.
सुप्रिया सुळेंनी पाडव्याच्या दिवशी दुपारी पवार कुटुंबाचे फोटो पोस्ट केले होते. त्यामध्ये सुनेत्रा पवार (अजित पवारांच्या पत्नी) दिसल्या होत्या. मात्र अजित पवार मिसिंग होते. त्यामुळे अजित पवार आता पाडव्याच्या कार्यक्रमाला येणार नाहीत असेच अंदाज वर्तवले जात होते. कारण राष्ट्रवादीत जी उभी फूट पडली त्यानंतर पवार कुटुंबाची ही पहिलीच दिवाळी होती. या दिवाळीत अजित पवार हे शरद पवारांना गोविंदबागेत भेटणार नाहीत अशीच चर्चा रंगली होती. कारण सकाळपासूनच शरद पवारांना भेटण्यासाठी लोकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची गोविंदबागेत गर्दी झाली होती. शरद पवारांच्या कुटुंबातले जवळपास सगळे सदस्य गोविंदबागेत आले. मात्र अजित पवार आले नव्हते. त्यामुळे अजित पवार हे आता गोविंदबागेत येणार नाहीत हे जवळपास निश्चित झालं होतं.
अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते कुठल्याही कार्यक्रमांना गेले नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे दादा (अजित पवार) इथे आला नसेल असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं. मात्र रात्री अजित पवार हे गोविंदबागेत आले. पाडवा त्यांनी पवार कुटुंबासह साजरा केला हे सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या फोटोंवरुनच स्पष्ट झालं आहे.
सुप्रिया सुळेंनी पाडव्याच्या संध्याकाळचे जे फोटो पोस्ट केले त्या फोटोंमध्ये अजित पवार हे शरद पवारांच्या पाठिशी उभे आहेत असंच दिसून येतं आहे. अजित पवार हे उशिरा शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पोहचले. मात्र पाडव्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ते गोविंदबागेत आले नाहीत याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन अजित पवारांनी आपली दिवाळी पवार कुटुंबासह साजरी केली.