दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दिवाळी म्हटलं की, रांगोळी, दिवे, फराळ आणि फटाके आलेच. दिवाळीत आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही (Diwali Firecrackers) केली जाते. मात्र, देशातल्या वाढत्या प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिवाळीत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. एखाद्या व्यक्तीने फटाके फोडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असं असलं तरी, नागरिकांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला. देशात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले.
मुंबईतही प्रदूषणाचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा असे दोनच तास फटाके उडवण्यास परवानगी दिली होती. मात्र मुंबईतल्या नागरिकांनी हा आदेश गांभीर्याने घेतलं नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह, कुलाबा परिसरात नियमांचं सार्वधिक उल्लंघन झालेलं पाहायला मिळतंय. फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणात भर पडली आहे तसेच फटाक्यांपासून होणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणही वाढलं आहे.
ठाण्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. ठाण्यात नागरिकांनी सायंकाळी सहा ते मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत फटाके फोडले आहेत. इतकच नव्हे तर ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीतही व डोंबिवलीतील सुशिक्षित असलेल्या सोसायटीमध्येही नियमांचं उल्लंघन झालेलं पाहायला मिळालं, अति फटाके फोडण्यामुळे ठाण्यातील हवेची गुणवत्ता घसरली.
कल्याणमध्येही नागरिकांच्या आरोग्याचे हित डोळ्यासमोर ठेवून दोन तास फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र तेथील नागरिकांनीही नियमांचे पालन केले. त्यात उल्हासनगर आणि भिवंडी यांचाही हवेच्या प्रदूषणात वाढ करण्यात भर आहे. अंबरनाथ बदलापूर मध्ये असेच चित्र पाहायला मिळालं.
पालघर जिल्ह्यातही दिवाळीनिमित्त रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात होते. यामुळे हवेतील प्रदूषण वाढलंच पण त्यासोबतच ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले. मीरा-भाईदंरमध्ये 32 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्यात तर बहुतांश लोकांनी कानठळ्या बसतील असे फटाके फोडून आसपासच्या लोकांना त्रास दिल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या.
वसई, नालासोपारा, विरार, नायगाव येथील ग्रामीण भागातही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले तर नवी मुंबईत ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, सीबीडी इथे देखील फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. इथेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत नागरिकांनी फटाके फोडले.
गेल्या दोन दिवसांत फटाकांच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबईत ७८४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली व ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्याची नागरिकांना परवानगी दिली होती. त्याआधी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने रात्री सात ते दहा दरम्यान फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत नसल्याने न्यायालयाने शुक्रवारच्या आदेशात फटाके फोडण्याच्या वेळेत कपात केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फटाके फोडण्याच्या वेळेवर न्यायालयाने बंधन घातली होती. मात्र नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याचं चित्र समोर आलं. अशातच निरोगी हवा हवी आहे की, फटाके फोडायचे आहेत हे नागरिकांनी ठरवावं असं म्हणत न्यायालयाने ही जबाबदारी नागरिकांवर सोपवली.