राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 मतदान होणार आहे.
5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र, गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. त्याच प्रमाणे, महाविकास आघाडी काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.