पुणे : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या. यासाठी जिल्ह्यात दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे विविध विषय व योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे श्रीमती कदम यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले.
अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यांचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा, विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हास्तरीय समितीतील सदस्य व अशासकीय सदस्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शांळामध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुणे जिल्ह्यातील दत्तकला इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली (ता. दौंड) व श्री व्यंकटेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल वालचंदनगर (ता. इंदापूर) या दोन शाळांना मान्यता देण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे, पोलीस ठाण्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करणे, गावे, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजने, ओळखपत्र देणे, स्थलांतरीत ठिकाणच्या शिधावाटप दुकानात शिधा मिळण्यासाठी पुरवठा विभागाकडे ऊसतोड कामगारांची माहिती उपलब्ध करून देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस सर्व विषय व योजना संबंधित जिल्हास्तरीय समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य, कर्मचारी आदी उपस्थित होते.