वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड काही अज्ञातांकडून करण्यात आली आहे. तोडफोडीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अनेक गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीनं अटक करावी, अशी मागणीही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “हल्लेखोरांना आणि त्यासोबतच मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय, ” हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या ? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, मी या भारताचे जे पिलर असतात 50 टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी 32 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.”
“जरांगे तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटीत घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हे सांगायचं आहे की, बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांना वाटेल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवंता तोडमोड केली जाऊ शकते”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“मी थांबणार नाही, या क्षणानंतर मीसुद्धा राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेल, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल”, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.
“माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण तिलाही मारण्याच्या आणि माझ्या पत्नीला उचलून नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे.” , असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.