पुणे : ससून रुग्णालयातून उपचार घेत असताना तीन ऑक्टोबर रोजी ड्रग्स माफिया ललित पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी आत्तापर्यंत एका पोलीस अधिकाऱ्यासह नऊ पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आल आहे. यामध्ये ड्रग्स विक्री प्रकरणी चार जणांचे तर ससून मधून पलायन केल्याप्रकरणी पाच पोलीसांचे निलंबन करण्यात आले आहे.
ड्रग रॅकेट प्रकरणी आतापर्यंत निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक फौजदार जनार्दन काळे, पोलीस कर्मचारी विशाल थोपले, स्वप्निल शिंदे आणि दिगंबर चंदनशिव यांचे ड्रग विक्री प्रकरणी विलंबन करण्यात आले. पलायन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम काळे, वीरप्पा बनसोडे आणि अमित जाधव यांचं निलंबन करण्यात आला आहे.
कोण आहे ललित पाटील ?
ललित पाटील हा एक ड्रग्स माफिया असून त्याच्या बंदोबस्तासाठी कोर्ट पार्टी नियुक्त करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ आढळून आले होते. यामध्ये ललित पाटील हा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल देखील आढळून आले. अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेने ससून रुग्णालय आणि कारागृहाकडे पत्र दिले होते. या आरोपीच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि इतरांची नेमणूक करण्यात आली होती. तरीही ललित पाटील याचा एक्स-रे काढण्यासाठी तळमजल्यावर आणण्यात आले असता तो पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला असल्याचं समजते आहे.